SR 24 NEWS

जनरल

मुळा नगर येथील निवासी अतिक्रमणे विकासित व नियमित करण्यासाठी नागरिकांचे युवानेते अक्षय कर्डिले यांना निवेदन

Spread the love

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी / जावेद शेख : राहुरी तालुक्यातील मुळा नगर येथील निवासी अतिक्रमणे विकासित व नियमन करण्यासंदर्भात येथील नागरिकांनी भाजपचे युवा नेते अक्षय दादा कर्डिले यांना निवेदन दिले. पाटबंधारे विभागाकडून मुळा नगर येथील रहिवाशांना अतिक्रमणे काढण्याबाबत नोटिसा प्राप्त झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुळा नगर परिसरात गेल्या ५० ते ६० वर्षांपासून नागरिक वास्तव्यास असून, निवासी स्वरूपाची ही अतिक्रमणे अचानक काढण्याबाबत नोटिसा दिल्याने नागरिक संभ्रमात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपली कैफियत अक्षय दादा कर्डिले यांच्यासमोर मांडत न्यायाची मागणी केली.

नागरिकांनी यावेळी सांगितले की, शासनाने यापूर्वी महसूल व वन विभागामार्फत शासकीय जागेवरील दीर्घकालीन निवासी अतिक्रमणे नियमनासाठी शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत. त्यानुसार वरवंडी ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक चारमधील मुळा नगर येथील अतिक्रमणे नियमानुसार नियमित होण्यासाठी पात्र असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.

यावेळी अक्षय दादा कर्डिले यांनी जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना या विषयाची सविस्तर माहिती देत नागरिकांच्या वतीने योग्य तो मार्ग काढण्याची विनंती केली. तसेच माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या काळात दिलेली, “मुळा नगर येथील नागरिकांच्या घराची एक वीटही हलू देणार नाही,” ही ग्वाही पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुळा नगर येथील रहिवाशांची अतिक्रमणे शासनाच्या नियमानुसार नियमनासाठी पात्र असून, या नागरिकांसाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे आशेचा किरण असल्याचे मत व्यक्त करत अक्षय दादा कर्डिले यांनी नागरिकांना ठाम आधार दिला. मुळा नगर वसाहत गावठाण घोषित व्हावी याबाबतचा प्रस्ताव सध्या मंत्रालयात प्रलंबित असून, या भागात शासनाच्या अनेक सुविधा आधीपासूनच राबविण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहू आणि मुळा नगरचा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रवीण लोखंडे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सलीम शेख, माजी सरपंच अंकुश बर्डे, ग्रामपंचायत सदस्य मुन्नाभाई परदेशी, मयूर गवळी, वायसे मामा, कैलास बर्डे, जालिंदर गायकवाड, माजी सरपंच शालिनीताई पोपळघट, दिलीप बर्डे, देवराज मनतोडे, कट्टप्पा, गोविंद पवार, राहुल गायकवाड तसेच महिला व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!