राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील शनिशिंगणापूर रोडवरील गोटुंबे आखाडा परिसरात रविवारी सकाळी जनावरे घेऊन जाणाऱ्या एका शेतकऱ्याच्या वाहनाची घोडेगाव येथील काही तथाकथित गोरक्षकांनी अडवणूक केल्याची घटना घडली. संबंधित व्यक्तींनी आपण बजरंग दलाचे गोरक्षक असल्याचा दावा करत वाहनचालकास अडवून अरेरावी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.या तथाकथित गोरक्षकांनी जनावरे कुणाकडून घेतली आहेत व कुठे नेली जात आहेत, अशी चौकशी करत कोणताही कायदेशीर अधिकार नसताना वाहनाच्या मार्गात अडथळा निर्माण केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे वाहनचालक त्रस्त झाला होता.
घटनेची माहिती मिळताच गोटुंबे आखाडा परिसरातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. कोणतीही अधिकृत परवानगी अथवा कायदेशीर अधिकार नसताना वाहन अडवून चौकशी व दादागिरी केल्याबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. स्थानिक नागरिकांनी जाब विचारताच संबंधित तथाकथित गोरक्षकांची चांगलीच गडबड उडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या घटनेमुळे काही काळ गोटुंबे आखाडा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र माजी सरपंच सचिन शेटे, माजी उपसरपंच उमेश बाचकर, रवींद्र चौधरी, मंगेश शेटे, राजेंद्र शेटे यांच्यासह उपस्थित नागरिकांनी तत्पर हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी लोणी परिसरातही अशाच प्रकारे काही तथाकथित गोरक्षकांनी एका शेतकरी तरुणाच्या वाहनाची अडवणूक करून त्यास मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर सदर तरुणाने बदनामी व नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्या घटनेनंतर मोठा उद्रेक झाला असतानाही अशा प्रकारांची पुनरावृत्ती होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
अशा बेकायदेशीर अडवणुकीस तात्काळ आळा घालावा, तसेच कायदा हातात घेणाऱ्या व्यक्तींवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
शनिशिंगणापूर रोडवरील गोटुंबे आखाडा येथे तथाकथित गोरक्षकांकडून जनावरांच्या वाहनाची अडवणूक; स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध

0Share
Leave a reply












