पारनेर विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : युरीया खताच्या खरेदीसाठी इतर औषधांची सक्ती शेतकर्यांना करून लूट केली जात आहे. याची गंभीर दखल घेऊन संबंधित कृषी दुकानदारांवर तातडीने कारवाई करण्यात यावी. अशी मागणी निलेश लंके प्रतिष्ठानचे पारनेर तालुका अध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांनी प्रतिष्ठानच्या वतीने तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली. औषधांची सक्ती न थांबल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आला.
सध्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांची पेरणीची कामे सुरू आहेत. हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने खताची उपलब्धता करून दिलेली आहेत. मात्र युरीया खताची खरेदी करताना पारनेर तालुक्यातील कृषी सेवा केंद्रातून तसेच काही दुकानदार आवश्यक नसलेल्या औषधांची सक्ती शेतकर्यांवर करीत आहेत. यामुळे शेतकर्यांची एकप्रकारे लूट होत असल्याची भावना व्यक्त होत असून,औषध घेतले तरच युरीया खत मिळेल, असे सांगण्यात येते. युरीया खत सरकारने उपलब्ध करून न दिल्याचा संभ्रम निर्माण करून दिला जात असल्याच्या अनेक तक्रारी शेतकर्यांनी खासदार निलेश लंके व प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांना भेटून निदर्शनास आणून दिल्या आहेत.
निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आज तालुका कृषी अधिकारी तसेच पंचायत समिती कृषी अधिकारी यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन सादर केले. कृषी सेवा केंद्र तसेच काही दुकानांमधून युरीया खत हवे असल्यास जाणिवपूर्वक इतरही औषधं खरेदी करण्याची सक्ती करून एक प्रकारे शेतकर्यांची अडवणूक केली जात आहे. वास्तविक खताची उपलब्धता असतानाही शेतकर्यांना खत उपलब्ध करून न देणे ही एकप्रकारे शेतकऱ्यांची अडवणूक असून या प्रश्नाची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांवर होणाऱ्या औषधांची सक्ती तातडीने थांबवावी, अशी मागणी प्रतिष्ठानच्या वतीने फोन करून केली आहे. तसेच तालुका कृषी अधिकारी यांना उद्या निवेदन देण्यात येणार असल्याचेही खिलारी यांनी यावेळी सांगितले.
कृषी दुकानदाराची शेतकऱ्याला अरेरावीची भाषा
काही कृषी सेवा केंद्रावर युरीया उपलब्ध असला तरी तो अवाच्या सव्वा दराने किंवा लिंकिंग खतासोबत विकला जात असल्याचे निदर्शनास आले. २८० रुपयांच्या ४५ किलोच्या युरीया पिशवीसह जबरदस्तीने लिंकिंग खत विकले जाते, ज्यासाठी शेतकऱ्यांकडून तब्बल १००० रुपये वसूल केले जातात, शेतकरी लिंकिंग खत घेण्यास नकार दिल्यास त्यांनी मला अरेरावीची भाषा वापरत अपमानित केले.
– बबनराव झावरे,टाकळी ढोकेश्वर, स्थानिक शेतकरी
कृषी विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष…
तालुक्यात राजरोसपणे जादा दराने खत विक्री आणि लिंकिंगची विक्री सुरू असताना देखील तालुक्यातील कृषी विभागाने मात्र गांधारीची भूमिका घेतल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे या प्रकारचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष आहे. याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शेतकर्यांची लूट थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन : बाळासाहेब खिलारी, पारनेर तालुक्यात युरियाची कृत्रिम टंचाई, जादा दराने अन्य खतांचे लिंकिंग करुन विक्री

0Share
Leave a reply













