प्रतिनिधी / किरण थोरात : हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील कदमवाक वस्ती परिसरात १५ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या अतिवृष्टीत कदमवाक वस्ती येथील वार्ड क्रमांक २ व ६ मधील अनेक घरांचे तसेच घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त नागरिकांनी तात्काळ शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती.
या घटनेनंतर तलाठी व मंडळाधिकारी यांनी नुकसानग्रस्त भागाचा सर्वेक्षण करून अहवाल तयार केला. मात्र, या सर्वेक्षणाला तब्बल चार महिने उलटून गेले तरी अद्यापही एकाही नागरिकाला नुकसान भरपाई मिळालेली नाही. नागरिकांचा आरोप आहे की तलाठी व सर्कल यांच्या निष्काळजीपणामुळे अर्ज पूर्णपणे भरले गेले नाहीत तसेच ते शासनाकडे सबमिटही करण्यात आले नाहीत. याबाबत वारंवार विचारणा केल्यानंतर संबंधित अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळाली नाही, तर स्थानिक नागरिकांच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
तसेच, पुढील दोन दिवसांत तलाठी व सर्कल कार्यालयाकडून अर्जांचे संपूर्ण तपशील देण्यात आले नाहीत, तर तलाठी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नुकसानग्रस्त नागरिकांनी दिला आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नुकसान भरपाई वितरित करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. एस आर ट्वेंटी फोर न्यूजकरीता किरण थोरात हवेली
Leave a reply













