सोनई प्रतिनिधी / मोहन शेगर :नेवासा तालुक्यातील चांदा शिवारात कंदुरी कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादातून गोळीबाराची गंभीर घटना घडली असून, यात शाहिद राजमहंमद शेख (वय २३) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे चांदा गावासह परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाले असून, त्यांचा कसून शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रविवार दि. ११ जानेवारी २०२५ रोजी चांदा शिवारात सुरज लतीफ शेख यांच्या चारी क्रमांक सहा जवळील वस्तीवर कंदुरीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मयत शाहिद राजमहंमद शेख हा बोकड कापण्यासाठी गेला होता. सायंकाळी सुमारे ४.४५ ते ७ वाजण्याच्या दरम्यान शाहिद शेख, सुरज लतीफ शेख आणि अक्षय जाधव यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला.
हा वाद काही वेळातच तीव्र स्वरूपाचा बनला. संतापाच्या भरात आरोपींनी अग्निशस्त्राचा वापर करून शाहिद शेख याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात शाहिद गंभीर जखमी झाला आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
घटनेनंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. दरम्यान, घटनेतील सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
घटनेची माहिती मिळताच सोनई पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे तसेच अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या घटनेमुळे चांदा व परिसरात गावठी कट्ट्यांच्या वाढत्या प्रमाणाबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. परिसरात बेकायदेशीर शस्त्रांचा सुळसुळाट होत असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात असून, पोलिसांनी गावठी कट्ट्यांचा शोध घेऊन अशा प्रकारे दहशत माजविणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
चांदा येथे कंदुरीच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादातुन गोळीबार, गोळीबारात शाहिद शेख या 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

0Share
Leave a reply












