SR 24 NEWS

अपघात

कोपरगावमध्ये शेतकऱ्याचा रोटाव्हेटरमध्ये अडकून जागीच मृत्यू; तालुक्यात हळहळ व्यक्त

Spread the love

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाटा (खिळडी गणेश शिवार) परिसरात शेती मशागतीदरम्यान ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटर यंत्रात अडकून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. ५ जानेवारी २०२६) दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडली. बाळनाथ साहेबराव रोहम (वय ६०) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाळनाथ रोहम हे सोमवारी दुपारी आपल्या शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागतीचे काम करत होते. यावेळी रोटाव्हेटर फिरत असताना त्यात कचरा व गवत अडकले. काम सुरळीत करण्याच्या उद्देशाने त्यांनी ट्रॅक्टर बंद न करता रोटाव्हेटरमधील अडकलेला कचरा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच क्षणी त्यांचा हात अचानक फिरत्या पात्यांमध्ये अडकला. यंत्राचा वेग अधिक असल्याने काही क्षणातच ते रोटाव्हेटरच्या विळख्यात ओढले गेले आणि या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची नोंद कोपरगाव पोलिसांत करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला.बाळनाथ रोहम हे कष्टाळू व मनमिळावू शेतकरी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, शेतीत यांत्रिकीकरण वाढले असले तरी निष्काळजीपणामुळे जीवघेणे अपघात घडत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. रोटाव्हेटर, थ्रेशर यांसारख्या यंत्रांमध्ये अडकलेला कचरा काढताना यंत्र पूर्णपणे बंद करूनच हाताळणी करावी, असे आवाहन कृषी तज्ज्ञ व पोलीस प्रशासनाकडून पुन्हा एकदा करण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!