SR 24 NEWS

अपघात

विक्रीस बंदी असलेल्या नायलॉन मांजामुळे श्रीरामपूरमध्ये तरुणाचा गळा कापला ; सुदैवाने तरुणाचा जीव थोडक्यात बचावला 

Spread the love

एसआर 24 न्यूज़ श्रीरामपूर / रंगनाथ तमनर : राज्यात विक्रीसाठी बंदी असलेल्या नायलॉन मांजामुळे श्रीरामपूर शहरात एक गंभीर घटना घडली आहे. नायलॉन मांजामुळे एका तरुणाचा गळा कापला जाऊन तो गंभीर जखमी झाला असून सुदैवाने त्याचा जीव थोडक्यात वाचला. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रविवारी श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती परिसरातील अक्षय कॉर्नरजवळून कामासाठी जात असताना सौरभ लोणकर या तरुणाच्या गळ्याला अचानक नायलॉन मांज लागली. धारदार मांज गळ्यात अडकल्याने लोणकर यांच्या गळ्याला खोल जखम झाली. तत्काळ उपचार मिळाल्याने मोठा अनर्थ टळला. राज्यात नायलॉन मांज विक्रीवर बंदी असतानाही शहरात सर्रासपणे अशा मांजाची विक्री व वापर होत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. विशेषतः दुचाकीस्वार व पादचाऱ्यांसाठी नायलॉन मांज जीवघेणी ठरत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नगरपालिका व पोलिस प्रशासनाने बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा भविष्यात अशा घटनांमध्ये जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!