SR 24 NEWS

क्राईम

बोल्हेगाव एमआयडीसी येथील महिलेच्या हत्येचा स्थानिक गुन्हेशाखेने लावला छडा ; चोरीच्या उद्देशाने महिलेचा खून करणाऱ्या चार युवतींची टोळी पोलिसांच्या ताब्यात

Spread the love

अहिल्यानगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : बोल्हेगाव, एमआयडीसी परिसरात झालेल्या एका महिलेच्या निर्घृण खुनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणला असून चोरीच्या उद्देशाने खून करणाऱ्या चार युवतींच्या टोळीला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. प्राप्त माहितीनुसार, दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी मनिषा बाळासाहेब शिंदे (वय ४०, रा. शनी मंदिराजवळ, कौस्तुभ कॉलनी, भारत बेकरी रोड, बोल्हेगाव, ता. जि. अहिल्यानगर) या त्यांच्या राहत्या घरी एकट्या असताना अज्ञात आरोपींनी घरात प्रवेश करून त्यांच्या गळ्यावर व हनुवटीवर धारदार हत्याराने वार करत खून केला होता.

या प्रकरणी मयत महिलेचे पती बाळासाहेब साहेबराव शिंदे (वय ४६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं. ११८३/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), ३३२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला अज्ञात आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष पथके तयार करण्यात आली. या पथकांनी घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला.

तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार हा खून दिव्या अंकुश देशमुख ऊर्फ दिव्या विजय खाडे (वय २०, रा. बालाजी नगर, बोल्हेगाव) हिने तिच्या इतर साथीदारांसह केल्याचे निष्पन्न झाले. दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी पोलिसांनी 1. दिव्या अंकुश देशमुख ऊर्फ दिव्या विजय खाडे (वय २०), 2. अंजुम ऊर्फ मेहक अहमद सैफी (वय २२, रा. मोरया पार्क, बोल्हेगाव; मूळ रा. नॉर्थ-ईस्ट दिल्ली), 3. विधीसंघर्षित बालिका (वय १६), 4. विधीसंघर्षित बालिका (वय १६) यांना महिला पोलीस अंमलदारांच्या माध्यमातून ताब्यात घेतले. चौकशीत आरोपी दिव्या देशमुख हिने कबुली दिली की, तिचे माहेर मयत महिलेच्या शेजारी असल्याने तिला मयत महिलेकडे असलेल्या दागिन्यांची माहिती होती. त्याच उद्देशाने तिने साथीदारांसह घरात प्रवेश करून गळ्यातील दागिने बळजबरीने काढण्याचा प्रयत्न केला. मयत महिलेने आरडाओरडा केल्याने आरोपींनी तिच्या गळ्यावर व हनुवटीवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास तोफखाना पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू आहे.ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!