SR 24 NEWS

अपघात

ब्राम्हणी बस स्टँड परिसरात अपघातांची मालिका; एका दिवसात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात एका जणाचा मृत्यू तर तीन जण जखमी, गतिरोधक नसल्याने ग्रामस्थांचा संताप, रास्ता रोकोचा इशारा

Spread the love

ब्राम्हणी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी बस स्टँड परिसरात राहुरी–शनिशिंगणापूर रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गुरुवार, दि. १८ डिसेंबर रोजी अवघ्या एका दिवसात दोन वेगवेगळ्या अपघातांत एका जणाचा जागीच मृत्यू झाला असून तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास ब्राम्हणी बस स्टँडजवळ दुचाकी व स्विफ्ट कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलवरील तीन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी दोघांवर अहिल्यानगर (नगर) येथे उपचार सुरू आहेत. त्याच दिवशी रात्री सुमारे १० वाजता दुचाकीवरून जाणाऱ्या ऊस तोडणी कामगाराचा अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघात झाला. या दुर्घटनेत अंदाजे ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

ब्राम्हणी बस स्टँड परिसरात कायमच मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. प्रवासी, खासगी वाहने तसेच अवजड वाहनांची वर्दळ दिवसभर सुरू असते. अशा ठिकाणी गतिरोधक असणे अत्यावश्यक असतानाही ब्राम्हणी बस स्टँडवर अद्याप गतिरोधक बसविण्यात आलेले नाहीत. परिणामी वाहने भरधाव वेगाने जात असून अपघातांची संख्या वाढत आहे.

उंबरे, पिंपरी अवघड, गोटुंबे आखाडा आदी गावांच्या बस स्टँड परिसरात गतिरोधक आहेत, मात्र ब्राम्हणी गावात का नाही, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. यापूर्वीही ब्राम्हणी बस स्थानक परिसरात अनेक अपघात घडले असून त्यात निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

एवढे बळी जाऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग आणखी किती अपघातांची वाट पाहणार, असा सवाल उपस्थित होत आहे. तात्काळ ब्राम्हणी बस स्टँड परिसरात गतिरोधक बसवावेत, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या गंभीर प्रकाराकडे संबंधित बांधकाम विभागाने त्वरित दखल घ्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!