राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) : थंडीच्या दिवसांत गरजवंत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत मिशन आपुलकी अंतर्गत आरोग्यम बहुउद्देशीय फाऊंडेशनच्या वतीने ‘चला तर आरोग्यम सोबत – एक मायेची ऊब’ या उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले.हा उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सोनवणे वस्ती, केंद्र–टाकळीमिया, ता. राहुरी येथे राबविण्यात आला. यामध्ये शालेय शिक्षण घेत असलेल्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना थंडीपासून संरक्षण मिळावे तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी, या उद्देशाने स्वेटरचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास आरोग्यम बहुउद्देशीय फाऊंडेशनचे अध्यक्ष कोमल घोडके, मुकूंद घोडके, मनोज कापरे, आर्किटेक्ट कॉलेजचे प्राचार्य सुहास चौधरी, राहुल आवारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी मन लावून चांगला अभ्यास केल्यास भविष्यात त्यांना शालेय उपयोगी साहित्य देण्यात येईल, असे आश्वासन श्री. घोडके सर यांनी दिले.
या उपक्रमासाठी श्रीमती साळवे राणी गुलाबराव मॅडम यांनी विशेष पाठपुरावा करून विद्यार्थ्यांसाठी स्वेटर उपलब्ध करून दिले. स्वेटर मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून उपस्थित सर्वांनाच समाधान वाटले. या कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती शेंदूरकर मनिषा यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.
आरोग्यम बहुउद्देशीय फाऊंडेशनकडून ‘मायेची ऊब’ उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप

0Share
Leave a reply












