राहुरी प्रतिनिधी : राहुरी नगर–मनमाड महामार्गावर राहुरी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दारूच्या नशेत असलेल्या एका इसमाने दुकानदारावर लोखंडी कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवार, दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
याबाबत सचिन दादासाहेब साळवे (रा. सडे, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते रात्री आपले दुकान बंद करत असताना नगर–मनमाड रस्त्यावर दारूच्या नशेत एक इसम आरडाओरड करत उभा होता. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने साळवे यांनी त्याला बाजूला जाण्याची सूचना केली. या सूचनेचा राग आल्याने संबंधित इसमाने अचानक लोखंडी कोयता काढून साळवे यांच्या कपाळावर वार केला.
त्यानंतर आरोपीने शिवीगाळ करत दमदाटी केली व साळवे यांच्या उजव्या पायावरही कोयत्याने वार केला. हल्लेखोराकडून कोयता हिसकावून घेत असताना साळवे यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. घटनेच्या वेळी राहुरी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षक तसेच नागरिकांनी तत्काळ धाव घेत साळवे यांना हल्लेखोराच्या तावडीतून सोडविले.
घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले व आरोपीस ताब्यात घेतले. उपस्थित नागरिकांनी हल्लेखोराचे नाव विशाल संभाजी लांडे (रा. नालेगाव, ता. व जि. अहिल्यानगर) असे असल्याचे सांगितले.या प्रकरणी सचिन दादासाहेब साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विशाल संभाजी लांडे याच्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.
राहुरी नगर-मनमाड महामार्गावर विद्यापीठ परिसरात दुकानदारावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; आरोपी ताब्यात

0Share
Leave a reply












