नांदेड प्रतिनिधी / धम्मदिप भद्रे : नरसी (ता. नायगांव) येथील दै. प्रजावाणीचे पत्रकार सुभाष संभाजी पेरकेवार (नरसीकर) यांचे आज सोमवार, दि. २२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी आकस्मिक व दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने नरसी परिसरासह पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कै. सुभाष पेरकेवार हे मनमिळावू स्वभावाचे, निर्भीड व अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित होते. त्यांनी अनेक वर्षे सामाजिक प्रश्न, जनतेच्या अडचणी व प्रशासनातील त्रुटींवर परखडपणे लेखन करून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, आई-वडील, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे.
कै. पेरकेवार यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ५ वाजता नरसी येथील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातलग, मित्रपरिवार, स्थानिक नागरिक तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने नरसी परिसरातील पत्रकारिता क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून विविध सामाजिक, राजकीय व पत्रकार संघटनांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
Leave a reply













