अहिल्यानगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर धडाकेबाज कारवाई करत प्रचंड दहशत निर्माण करणारे प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांचा चार महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी १९ जुलै रोजी पूर्ण झाला. त्यांच्या या उल्लेखनीय सेवेसाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने त्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. संतोष खाडे यांना पोलीस उप अधीक्षक पदाच्या प्रशिक्षणासाठी अहिल्यानगर जिल्ह्यात नियुक्त करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांनी नेवासा पोलीस ठाण्यात तीन महिन्यांचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकात एक महिन्याचे विशेष प्रशिक्षण त्यांनी पार पाडले.
अहिल्यानगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठा जिल्हा मानला जातो. येथे अवैध धंद्यांचे प्रमाण मोठे असून, कारवाई करताना अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. अशा कठीण परिस्थितीतही संतोष खाडे यांनी चार महिन्यांत जिल्ह्यातील अनेक अवैध गुऱ्हाळांवर, सुगंधी तंबाखू व मावा उत्पादकांवर, जुगार अड्ड्यांवर तसेच बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली.
त्यांच्या या कार्यवाहीमुळे गोवंशीय जनावरांच्या कत्तलखान्यांवरही बंदी घालण्यात आली. त्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्या गटांना मोठा धक्का बसला होता. संतोष खाडे यांचं नाव घेताच अनेकांनी धसका घेतला होता, अशी भावना नागरिकांमध्ये होती. त्यांच्या या निडर व कार्यक्षम कामगिरीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांचं मोठं कौतुक होत आहे. त्यांच्या या कर्तृत्वाला पोलीस दलाकडूनही मान्यता मिळाली असून १९ जुलै रोजी झालेल्या निरोप समारंभात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व अमोल भारती यांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात आला.
खाडे यांचं उर्वरित दोन महिन्यांचं प्रशिक्षण आता इतर जिल्ह्यात होणार आहे. त्यानंतर एकूण सहा महिन्यांचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची पोलीस उप अधीक्षक पदावर नियुक्ती होणार आहे. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची जिल्ह्यातील नागरिकांना नक्कीच आठवण येत राहील.
अवैध धंद्यांवर धडक कारवाई करणाऱ्या प्रशिक्षणार्थी डीवायएसपी संतोष खाडे यांचा कार्यकाळ पूर्ण, संतोष खाडे यांना जिल्हा पोलीस दलाच्यावतीने सन्मानपूर्वक निरोप

0Share
Leave a reply











