राहुरी प्रतिनिधी /ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे एका घरामध्ये मशिनच्या साह्याने सुगंधी तंबाखु व सुपारी मिश्रीत मावा विक्रीसाठी तयार करत असलेल्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून १ लाख ४६ हजार ५४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पो.नि.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश लोंढे, गणेश धोत्रे रणजीत जाधव, विशाल तनपुरे यांचे पथक तयार करून राहरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन त्यांच्याविरुध्द कारवाई करणेबाबत सूचना देऊन पथक रवाना केले.
शुक्रवार दि. १८ जुलै रोजी पथक राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना, पथकास गोपनीय मिळाली की, पप्पू जाधव हा वांबोरी ते देहरे जाणाऱ्या रस्त्यालगत, मोरे वस्ती, वांबोरी येथे एका घरामध्ये सुगंधी तंबाखू व सुपारी मिश्रीत मावा विक्रीसाठी तयार करत आहे. पथकाने पंचासमक्ष या ठिकाणी छापा टाकला असता राहुल उर्फ पिनू गोरक्षनाथ जाधव (वय ३०, रा. वांबोरी, ता. राहुरी) हा इलेक्ट्रीक मशीनवर मावा तयार करताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता तो व त्याचा भाऊ अमोल उर्फ पप्पू गोरक्षनाथ जाधव हा सुगंधित मावा तयार करत असल्याचे सांगीतले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणावरून १ लाख ४६ हजार ५४० रुपये किंमतीचा १५ किलो सुगंधीत मावा, १० किलो सुपारी, १ इलेक्ट्रीक मोटार व मशीन, एक वजनकाटा, २ किलो चुना, सुगंधीत तंबाखु असा मुद्देमाल जप्त केला. ताब्यातील आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर करून आरोपीविरूध्द राहुरी पोलीस ठाण्यात बीएनएस २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) सह अन्न सुरक्षा मानके अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक, सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक, सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
वांबोरी येथे मावा व सुगंधीत तंबाखु विक्रेत्यावर ‘एलसीबी’ चा छापा, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

0Share
Leave a reply












