तुळजापूर प्रतिनिधी, ( चंद्रकांत हगलगुंडे) – “विद्यार्थ्यांना न शिकवणं म्हणजे स्वतःच्या पुढील दहा पिढ्यांना शाप आहे. प्राध्यापकांमध्ये शिक्षक नेहमी जिवंत असला पाहिजे. गलेलठ्ठ पगार घेऊनही आज प्राध्यापकांमध्ये शिकवण्याची तळमळ दिसत नाही. वर्गात एकच विद्यार्थी असला तरी त्याला शिकवलं पाहिजे.” अशा कडक शब्दांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी प्राध्यापकांना धारेवर धरले.
ते अणदूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि जवाहर महाविद्यालय अणदूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय युवक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व अणदूरचे सरपंच रामचंद्र आलुरे होते. व्यासपीठावर ज्येष्ठ अभिनेते उमेश जगताप, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. लक्ष्मीकांत पाटील, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. अंकुश कदम, जवाहर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. कैलास आंभूरे, युवक महोत्सव जिल्हा समन्वयक डॉ. संदीप देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. फुलारी पुढे म्हणाले की, बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची उपस्थिती घटत आहे. यामागे प्राध्यापकांच्या अनास्थेला मोठ्या प्रमाणात जबाबदार धरणे भाग आहे. “गलेलठ्ठ पगार घेत असूनही महाविद्यालयाच्या वाचनालयात प्राध्यापक वाचताना दिसत नाहीत. वाचनच नसेल तर विद्यार्थ्यांना शिक्षण काय द्यायचे? पुढाऱ्यांच्या मागे फिरण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या भविष्याकरिता कार्य करणे गरजेचे आहे,” असा सवाल करत त्यांनी परिस्थिती बदलण्याचे आवाहन केले.विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी शिक्षणपद्धती अवलंबली, तर बेरोजगारी कमी करण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.
यावेळी डॉ. कैलास आंभूरे यांनी युवक महोत्सवाची भूमिका मांडली. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी यांनी केले, तर अध्यक्षीय समारोप रामचंद्र आलुरे यांनी केला. प्राध्यापक डॉ. मल्लिनाथ बिराजदार यांनी आभार मानले.या युवक महोत्सवात उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यातील सुमारे ४०० विद्यार्थी, प्राध्यापक व अणदूर परिसरातील कलाप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Leave a reply













