SR 24 NEWS

इतर

पारनेर हादरले! बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय बालकाचा मृत्यू, तालुक्यात एकाच आठवड्यात दुसरी घटना; वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत वाढता प्रवेश चिंताजनक

Spread the love

पारनेर (प्रतिनिधी गंगासागर पोकळे) : पारनेर तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याने मृत्यूची घटना घडली असून यामुळे परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. सोमवारी (दि. ८ सप्टेंबर) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सिद्धेश्वरवाडी रस्त्यावरील बारामती ॲग्रो परिसरात तीन वर्षीय अमन पन्नूलाल खोटे या बालकावर बिबट्याने झडप घालून त्याला जंगलाकडे ओढून नेले. आईच्या डोळ्यासमोर घडलेल्या या घटनेमुळे परिसर हादरून गेला.

अमनचे कुटुंब बांधकाम मजूर म्हणून येथे वास्तव्यास असून, तो लघुशंकेसाठी घराबाहेर आला असताना अचानक बिबट्याने हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी वन विभागाशी संपर्क साधला. वन विभागाने तत्काळ शोधमोहीम सुरू केली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या मोहिमेत स्थानिक ग्रामस्थही सहभागी झाले. अखेर मंगळवारी (दि. ९ सप्टेंबर) सकाळी आठ वाजता घटनास्थळापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर झाडाझुडपात अमनचा मृतदेह आढळला.

या शोधकार्यात वनपरिक्षेत्र अधिकारी जी. व्ही. धाडे, वनपाल एम. वाय. शेख, वनरक्षक अफसर पठाण, फारुख शेख, कानिफनाथ साबळे, एस. के. कारले, साहेबराव भालेकर व अंकराज जाधव यांनी सहभाग नोंदवला. बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात पिंजरे लावण्यात आले असून गस्तही वाढवण्यात आली आहे.

याआधी २ सप्टेंबर रोजी कळस येथेही अशाच प्रकारे बिबट्याच्या हल्ल्यात एका बालकाचा मृत्यू झाला होता. एका आठवड्यात घडलेल्या दोन दुर्दैवी घटनांमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. पाळीव प्राण्यांवर सतत होत असलेल्या बिबट्याच्या हल्ल्यांमुळेही लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

वन विभागाने नागरिकांना रात्री सावधगिरी बाळगण्याचे, लहान मुलांना एकटे न सोडण्याचे आवाहन केले आहे. तसेच परिसरात सतर्कता ठेवून तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!