श्रीरामपूर प्रतिनिधी / रंगनाथ तमनर : श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे जमिनीचा हिस्सा व विक्रीच्या पैशांच्या वादातून भाच्याने आपल्या तीन साथीदारांसह मामावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना १४ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री घडली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवानंद गोपीचंद खरे (वय ५८, रा. खंडाळा) यांनी या घटनेची फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, १४ जानेवारी रोजी रात्री सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास देवानंद खरे व त्यांचे वडील घरासमोर झोपलेले असताना त्यांचा भाचा शमुवेल राजू थोरात हा तीन अनोळखी इसमांसह तेथे आला. “माझ्या आईला जमिनीचा हिस्सा आणि विकलेल्या जमिनीचे पैसे का देत नाही?” असे म्हणत त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वाद वाढत गेल्यानंतर शमुवेल थोरात याने त्याच्याजवळील चाकूने देवानंद खरे यांच्या छातीवर वार करून त्यांना जखमी केले. तसेच त्याच्यासोबत असलेल्या इतर तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घरातील व्यक्तींनी हस्तक्षेप करून वाद सोडवण्याचा प्रयत्न केला असता, “पैसे दिले नाहीत तर जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी आरोपी शमुवेल राजू थोरात व त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक औताडे पुढील तपास करीत आहेत.
खंडाळा येथे जमिनीच्या हिस्स्यावरून व विक्रीच्या पैशांच्या वादातून भाच्याचा मामावर चाकूने हल्ला, श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे मध्यरात्री थरार; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0Share
Leave a reply












