अहिल्यानगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : पारनेर तालुक्यातील माळकूप (ढवळपुरी फाटा) परिसरात कार्यरत असलेल्या कृषीनाथ ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखाना व डिस्टिलरी प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या रसायनमिश्रित सांडपाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची शेती नापीक होत असून नागरिकांच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ठोस कारवाई होत नसल्याने शेतकरी व अन्याय निवारण समितीने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
कृषीनाथ ग्रीन एनर्जी साखर कारखाना व डिस्टिलरी प्लांटमधून दररोज हजारो लिटर रसायनमिश्रित सांडपाणी व मळी शासनाच्या नियमांनुसार विल्हेवाट न लावता भनगडेवाडी, ढवळपुरी परिसरात टाकली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. कारखान्याच्या पश्चिम बाजूला असलेल्या ओढ्यात तसेच वनविभागाच्या हद्दीतील जमिनीत हे सांडपाणी सोडले जात असल्यामुळे ओढ्याचे संपूर्ण पात्र प्रदूषित झाले आहे.
पूर्वी या ओढ्याचे पाणी कपडे धुणे तसेच जनावरांना पिण्यासाठी वापरले जात होते. मात्र, कारखान्याने रसायनमिश्रित पाणी सोडण्यास सुरुवात केल्यापासून हे पाणी वापरण्यायोग्य राहिलेले नाही. पावसाळ्यात ओढा दुथडी भरून वाहत असताना कारखान्यातील प्रदूषित पाणी मोठ्या प्रमाणात सोडले जात असल्याने हे पाणी आजूबाजूच्या शेतांमध्ये पसरते व शेती कायमस्वरूपी नापीक होण्याचा धोका वाढत आहे, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे.
या रसायनयुक्त सांडपाण्यामुळे अनेक विहिरींमधील पाणी ऑसिडयुक्त झाले असून नागरिकांना विविध दुर्धर आजारांचा धोका निर्माण झाला आहे. तसेच कारखान्याने आपल्या मालकीच्या जागेत बंधनकारक असलेली ३० टक्के वृक्षलागवडही केलेली नाही. याशिवाय, कारखान्यालगतच्या शेतजमिनीचे नुकसान होऊनही शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे नुकसानभरपाई अद्याप कोणत्याही शेतकऱ्याला देण्यात आलेली नाही.
या गंभीर बाबींवर कारखान्याने शासनाचे अनेक नियम धाब्यावर बसवले असून विभागीय स्तरावर त्रयस्थ यंत्रणेमार्फत सखोल तपासणी करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. मात्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अहिल्यानगर कार्यालय कारखाना प्रशासनाशी संगनमत करून केवळ कागदी कारवाई करत असल्याचा आरोप शेतकरी व नागरिकांनी केला आहे. त्यामुळे ओढ्याच्या दोन्ही तीरांवरील शेकडो एकर शेती कायमस्वरूपी नापीक होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
‘कृषीनाथ’च्या रासायनिक सांडपाण्यामुळे शेतकऱ्यांची शेती धोक्यात, तक्रारी करूनही प्रदूषण विभागाचे दुर्लक्ष; संतप्त शेतकऱ्यांचा २६ जानेवारीपासून बेमुदत उपोषणाचा इशारा

0Share
Leave a reply












