तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे जय मल्हार पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला २०२६ वर्षाची दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व कै. शिवशंकर आलुरे स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण कार्यक्रम बुधवार, दि. १४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता हुतात्मा स्मारक सभागृहात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. उमाकांत चन्नशेट्टी हे होते. प्रमुख अतिथी म्हणून ष. ब्र. शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत हागलगुंडे, अविनाश मोकाशे व सुरेश आलुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते २०२६ या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर पत्रकारितेतील उल्लेखनीय व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्याबद्दल कै. शिवशंकर आलुरे यांच्या स्मरणार्थ पत्रकार जगदीश कुलकर्णी यांना शाल, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून आदर्श पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवशंकर तिरगुळे यांनी केले. सन्मानपत्राचे वाचन चंद्रकांत गुड्ड यांनी केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. डॉ. एम. बी. बिराजदार यांनी केले, तर शिवाजी कांबळे यांनी उपस्थित मान्यवर, पत्रकार बांधव व नागरिकांचे आभार मानले. अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. उमाकांत चन्नशेट्टी यांनी पत्रकारितेचे सामाजिक महत्त्व विशद करत सत्यनिष्ठ, निर्भय व मूल्याधिष्ठित पत्रकारितेची आजच्या काळात नितांत गरज असल्याचे प्रतिपादन केले. प्रमुख अतिथी ष. ब्र. शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपल्या आशीर्वचनातून पत्रकारांनी समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने सुरू ठेवावे, असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास ग्रामस्थ, पत्रकार बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पत्रकार श्रीकांत अणदूरकर, दयानंद कांळुखे, चंद्रकांत हागलगुंडे, चंद्रकांत गुड्ड, संजीव आलुरे, शिवशंकर तिरगुळे, सचिन तोग्गी, शिवाजी कांबळे आदींसह जय मल्हार पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
अणदूर येथे जय मल्हार पत्रकार संघाच्यावतीने दिनदर्शिका प्रकाशन व कै.शिवशंकर आलुरे स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

0Share
Leave a reply












