तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले असून प्रचारासाठीचा कालावधी कमी असला तरी इच्छुक उमेदवारांनी गेल्या दोन महिन्यांपासूनच आपल्या-आपल्या मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर काक्रंबा जिल्हा परिषद गटातून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे.
अस्मिता कांबळे या यापूर्वी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राहिल्या असून त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सर्वसामान्यांच्या विकासाला प्राधान्य दिले. शहापूर व मंगरूळ या जिल्हा परिषद गटातून त्यांनी निवडणूक लढवून विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला होता. सार्वजनिक पाणीपुरवठा, रस्ते, वीज तसेच जिल्हा परिषदेअंतर्गत विविध विकासकामांचा निधी प्रभावीपणे संबंधित मतदारसंघांमध्ये राबवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
त्यांचे वडील शिवदास कांबळे हे देखील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असून मंगरूळ व काक्रंबा या दोन्ही मतदारसंघांतून त्यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला होता. मंगरूळ मतदारसंघातून निवडून आल्यानंतर त्यांनी समाजकल्याण सभापती म्हणून तर काक्रंबा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून प्रभावी काम केले आहे. त्यांच्या कार्यकाळातील विकासकामे आजही मतदारसंघाच्या विकासाचा ठसा उमटवणारी ठरली आहेत.
अस्मिता कांबळे यांना काक्रंबा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी दिल्यास विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. सध्या या मतदारसंघात तुल्यबळ असा विरोधी उमेदवार नसून अस्मिता कांबळे यांचे काम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यांनी आपल्या वडिलांचा विकासाचा वारसा पुढे नेत मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
काक्रंबा गटाचा खऱ्या अर्थाने विकास साधायचा असेल तर अस्मिता कांबळे यांनाच उमेदवारी द्यावी, अशी एकमुखी मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून होत असून, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी कार्यकर्ते स्वतः घेतील, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.
काक्रंबा गटातून अस्मिता कांबळे यांना उमेदवारी द्यावी; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी

0Share
Leave a reply












