SR 24 NEWS

कृषी विषयी

आंबा पिकावर लीफ मायनरचा वाढता प्रादुर्भाव; राहुरी कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांचा हॉर्टसॅपद्वारे इशारा

Spread the love

राहुरी  विद्यापीठ : महाराष्ट्रातील आंबा उत्पादन क्षेत्रात गेल्या काही दिवसांत ‘लीफ मायनर’ या किडीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत असून, शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील तज्ज्ञांनी केले आहे. काजू पिकाची प्रमुख कीड म्हणून ओळखली जाणारी ही कीड आता आंबा पिकावरही नुकसान करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

बदलत्या हवामानामुळे किडींच्या वर्तनात होत असलेले बदल आणि पावसाळ्यानंतर निर्माण होणारे दमट वातावरण यामुळे आंब्याच्या कोवळ्या पानांवर या किडीचा प्रादुर्भाव वाढल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. अहमदनगर, सोलापूर तसेच पुणे व रत्नागिरी जिल्ह्यांतील विविध भागांतून या किडीचे नमुने कृषी विद्यापीठास प्राप्त झाले आहेत.

‘अक्रोसेरकॉप्स सिंग्राम्मा’ या शास्त्रीय नावाने ओळखली जाणारी ही कीड आंबा, काजू व जांभूळ पिकांवर आढळते. अळ्या पानांच्या आतील उतींमध्ये सुरंग तयार करून भक्षण करतात. त्यामुळे पानांवर वाकड्या-वळणदार खुणा, फोडसदृश सूज, करडपट डाग व छिद्रे पडतात. लहान रोपांवर प्रादुर्भाव अधिक असून कोवळी पाने अकाली गळून पडतात.

या पार्श्वभूमीवर डॉ. संजय कोळसे, डॉ. रविंद्र गायकवाड, डॉ. प्रवीण खैरे आणि डॉ. सखाराम आघाव यांनी शेतकऱ्यांना प्रादुर्भावग्रस्त पाने नष्ट करणे, खाली पडलेला पालापाचोळा काढून जमिनीची मशागत करणे तसेच मित्रकिटकांचे संवर्धन करण्याचा सल्ला दिला आहे. नियमित निरीक्षण ठेवून किडीचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

लीफ मायनर ही कीड दुय्यम मानली जात असली तरी सध्याच्या हवामान परिस्थितीत तिचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेवर उपाययोजना राबवून आंबा पिकाचे संरक्षण करावे, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!