SR 24 NEWS

इतर

राहुरीत रॉंग साईडने वाहने चालवीणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांनी उचलला कारवाईचा बडगा, एसटीच्या ४ बससह ३२ वाहनांवर कारवाई; २२ हजार रुपयांचा दंड वसूल

Spread the love

राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) : नगर–मनमाड महामार्गावर सध्या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली आहे. परिणामी वारंवार वाहतूक कोंडी होत असून, काही वाहनचालकांकडून वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करत रॉंग साईडने वाहने चालविली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. अशीच घटना राहुरी येथील मुळा नदी पुलावर घडली. वाहतूक कोंडीमुळे अनेक वाहनचालकांनी रॉंग साईडने वाहने घातल्याने महामार्गावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला. ही बाब राहुरी पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ कारवाई करत राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ४ बस तसेच इतर २८ वाहनांवर अशी एकूण ३२ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईतून एकूण २२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

सदर कारवाई राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी केली. महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असताना रॉंग साईडने वाहन चालविणे अत्यंत धोकादायक असून, यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढते तसेच संपूर्ण वाहतूक व्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो, असे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी वाहनचालकांना आवाहन केले आहे की, वाहतूक कोंडी होत असली तरी कोणत्याही परिस्थितीत रॉंग साईडने वाहने चालवू नयेत. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन केल्यास अपघात टाळता येतील आणि सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहील, असेही त्यांनी सांगितले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!