प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : सोनई शहरातील इंदिरानगर परिसरात घरफोडीची घटना घडून अज्ञात चोरट्यांनी एका वृद्ध महिलेच्या घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची फिर्याद अमोल सोमनाथ फुलारी (वय ३०, व्यवसाय – नोकरी, रा. सोनई, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) यांनी दिली आहे.
फिर्यादी यांच्या आजीचे इंदिरानगर, सोनई येथील राहते घर असून दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी २.०० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घराच्या पाठीमागील खिडकी तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेण्यात आला.
ही घटना लक्षात येताच फिर्यादी यांनी तत्काळ सोनई पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानुसार सोनई पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ३०५ (अ) व ३३१ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच शेवगाव विभागाचे एसडीपीओ राजगुरु यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी व पोलीस उपनिरीक्षक लबडे यांनीही घटनास्थळी पाहणी केली. पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लबडे करत असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.
Leave a reply













