SR 24 NEWS

इतर

१४ गाव पाणी योजनेचा बोजवारा; मानोरी गावाला नियमित पाण्यापासून वंचित ठेवण्याचा आरोप

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / सोमनाथ वाघ :  बारागाव नांदूरसह १४ गाव पाणी योजनेअंतर्गत येणाऱ्या मानोरी गावावर गेल्या अडीच वर्षांपासून पाणीपुरवठ्याबाबत गंभीर अन्याय होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. योजना कार्यान्वित असतानाही मानोरी गावाला नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. मानोरी हे १४ गाव पाणी योजनेतील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे गाव असतानाही पाणीपुरवठ्याच्या बाबतीत सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. योजनेतील वरच्या टप्प्यातील गावांना दररोज मुबलक पाणी दिले जात असताना, शेवटच्या टप्प्यावर असलेल्या मानोरी गावाला मात्र अत्यंत अपुरा व अनियमित पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप होत आहे.

ग्रामस्थांच्या माहितीनुसार, मानोरी गावाच्या पाण्याच्या टाकीत दररोज दोन मीटर पाणीही मिळत नाही. टाकी कधीच पूर्ण क्षमतेने भरलेली नसते. क्वचितच आठवड्यातून एखाद्या दिवशी पाण्याचा दाब अधिक असल्यास टाकी भरते; मात्र त्यानंतर पुन्हा अनेक दिवस पाणीपुरवठा जैसे-थेच राहतो. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या योजनेअंतर्गत वरच्या गावांना पाण्याची गरज भासली की मानोरीकडे येणारा कॉक (व्हॉल्व्ह) बंद केला जातो, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पाणीपुरवठा लाईनवरील शेवटची वसाहत असल्याने हा अन्याय केवळ मानोरीच्या वाट्याला येत असल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र आहे. विशेष म्हणजे, पाणी योजनेचे कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात जास्त दाबाने पाणी सोडतात. मात्र हा पाणीपुरवठा केवळ एक-दोन दिवसच सुरळीत राहतो. त्यानंतर पुन्हा पूर्वीप्रमाणेच अपुरा व अनियमित पाणीपुरवठा सुरू होतो. त्यामुळे प्रशासनाकडून केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.

याबाबत पाणी योजनेच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधल्यास, “आम्ही फक्त वरून येणारे पाणी सोडतो; स्थानिक पाणीवाटपाचे नियोजन योग्य नाही,” असे उत्तर दिले जाते. मात्र वरून पाणी नियमित मिळत असेल, तर मानोरीसाठी योग्य नियोजन का केले जात नाही, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.पाण्याअभावी मानोरी गावातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. महिलांना पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत असून शेतकरी, विद्यार्थी व वृद्ध नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावात तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, मानोरी ग्रामस्थांनी गावाला स्वतंत्र पाणी योजना देण्याची किंवा अन्य कोणत्या तरी पाणी योजनेशी जोडण्याची मागणी केली आहे. अन्यथा सध्याच्या १४ गाव पाणी योजनेतून कायमस्वरूपी व न्याय्य पाणीपुरवठ्याची ठोस व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसे न झाल्यास १४ गाव पाणी योजनेच्या आगामी बैठकीत अधिकाऱ्यांना जाब विचारून आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

१४ गाव पाणी योजनेचा उद्देश सर्व गावांना समान पाणीपुरवठा करण्याचा असताना प्रत्यक्षात मात्र मानोरी गावावर सातत्याने अन्याय होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन अटळ असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!