SR 24 NEWS

इतर

शिक्षणासोबत सुसंस्कारित पिढी घडवण्याचे श्री विद्यार्थी समुपदेशन केंद्राचे कार्य प्रेरणादायी – तिरगुळे

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे :सध्याचा काळ भोगवादी विचारसरणीकडे झुकलेला असून अल्पावधीत कशी भरभराट होईल, याचाच विचार सर्वत्र दिसून येतो. अशा परिस्थितीत शिक्षणासोबत सुसंस्कारित पिढी घडवण्याचे कार्य करणारे श्री विद्यार्थी समुपदेशन केंद्र समाजाला दिशा व प्रेरणा देणारे असल्याचे गौरवोद्गार व्हॉईस ऑफ मीडिया धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष शिवशंकर तिरगुळे यांनी काढले.

ते दर्पण दिनानिमित्त श्री विद्यार्थी समुपदेशन केंद्र, श्री कोचिंग क्लासेस व विद्यार्थी वस्तीगृह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार सत्कार समारंभात बोलत होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीस दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर बसवराज निसरगुंडे व विद्यार्थ्यांच्या वतीने पत्रकारांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत भगीरथ उर्फ नाना कुलकर्णी हे होते.

यावेळी बोलताना तिरगुळे म्हणाले की, अवघ्या चार वर्षांत श्री कोचिंग क्लासेसने गोरगरीब व निराधार विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणत गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आदर्श निर्माण केला आहे. शिक्षणातील पोकळी भरून काढण्याचा हा प्रयत्न दिशादर्शक असून समाजासाठी प्रेरणादायी आहे.पत्रकारांच्या भूमिकेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, समाजातील वास्तव घटनांचे स्वरूप जनतेसमोर आणताना पत्रकार स्वतःच्या सुरक्षिततेची पर्वा न करता सत्याचा शोध घेतो. पत्रकार फक्त बातम्या देणारा नसून तो समाजातील सामान्यांचा आवाज बनून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडतो. गोरगरीब, कष्टकरी व शेतकऱ्यांचे दुःख लेखणीच्या माध्यमातून जनतेसमोर व प्रशासनासमोर मांडण्याचे मोलाचे कार्य पत्रकार करतात, असेही त्यांनी नमूद केले.

प्रास्ताविकात बोलताना बसवराज निसरगुंडे म्हणाले की, अवघ्या ३० विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या कोचिंग क्लासेस व विद्यार्थी वस्तीगृहाची संख्या चार वर्षांत ३०० पर्यंत पोहोचली आहे. गुणवत्तापूर्ण व दिशादर्शक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सक्षम विद्यार्थी घडवणे ही आमची जबाबदारी असून केवळ नफा न पाहता शिक्षणातील दरी कमी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी डॉ. नागनाथ कुंभार, भगीरथ कुलकर्णी गुरुजी व राजेंद्र स्वामी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी कदम यांनी केले, तर आभार बसवराज निसरगुंडे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!