दौंड प्रतिनिधी / नितीन पाटुळे : प्रती गाणगापूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र पडवी माळवाडी येथे दि. ४ डिसेंबर २०२५ रोजी गुरुवारी श्री दत्त मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्याचे भक्तीमय वातावरणात आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत, सद्गुरू श्री आण्णा महाराज रंधवे यांच्या हस्ते हा मंगल सोहळा पार पडला.
श्री दत्त जयंतीनिमित्त मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत दि. २८ नोव्हेंबरला सुरु करण्यात आलेल्या सामूहिक श्री गुरुचरित्र पारायणात २०० हून अधिक भाविकांनी सहभाग नोंदवत सातत्याने भक्तीभावाने पठण केले. गुरुवारच्या पवित्र दिवशी जयंती आल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
दि. ४ डिसेंबर रोजी दिवसभर चाललेल्या कार्यक्रमांत सकाळी ७ वाजता श्री दत्त महाराज आरतीने सुरुवात झाली. त्यानंतर गुरुचरित्र पारायणाची समाप्ती, सत्यनारायण पूजा, श्री दत्त महाराजांचा अभिषेक, सकाळी ११.०३ वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि त्यानंतर दत्तयाग व होमहवन असे विधी पार पडले. दुपारी हरिभजनानंतर सायंकाळी किर्तनसेवेत ह.भ.प. सौ. नेहा ताई भोसले महाराज साळेकर यांनी सुश्राव्य कीर्तन सादर केले. नेमक्या ६.०३ वाजता श्री दत्त महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात आला आणि कार्यक्रमाची सांगता सायं ७ वाजता महाप्रसादाने झाली.
श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे गेली २२ वर्षे भाविकांच्या विविध समस्यांचे निवारण सद्गुरू श्री आण्णा महाराज यांच्या मार्गदर्शनातून विनामूल्य केले जात आहे. श्रद्धा, संयम, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन आणि सद्वर्तन याबाबत ते दर गुरुवारी भाविकांना मार्गदर्शन करतात. अनेकांनी त्यांच्या मार्गदर्शनामुळे जीवनातील अडचणींवर मात केल्याचा अनुभव व्यक्त केला आहे.
या भव्य सोहळ्याच्या यशस्वितेसाठी श्री दत्त औदुंबर सेवा संस्था, सुवर्ण मित्र मंडळ (निंबाळकर वस्ती), शिवछत्रपती मंडळ (शितोळे वस्ती), हनुमान मित्र मंडळ, जनसेवा तरुण मंडळ, श्री महालक्ष्मी प्रतिष्ठान आणि नागनाथ मित्र मंडळ (पाटस) यांसह सेवेकरी भक्तांनी उत्साहाने सेवा बजावली.
पडवी माळवाडी येथे श्री दत्त मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व जन्मोत्सव सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न

0Share
Leave a reply












