नांदेड प्रतिनिधी/धम्मदिप भद्रे : शहरातील वाढत्या वाहतूक समस्येवर वैज्ञानिक समाधान शोधण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर मोठे यश मिळाले आहे. राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी मागील एक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केलेल्या या विषयावर केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. राज्यसभेत विचारलेल्या अतारांकित प्रश्न क्रमांक ६०४ ला उत्तर देताना केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी नांदेडसाठी वाहतूक सर्वेक्षण करण्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.
CSIR–CRRI या देशातील अग्रगण्य संशोधन संस्थेकडे नांदेडसाठी एप्रिल 2025 मध्ये ट्रॅफिक सर्वेक्षणाचा प्रस्ताव सादर केला होता. तख्त श्री हजूर साहिब नांदेड हे देशातील एक प्रमुख शीख तीर्थक्षेत्र असल्याने, संस्थेकडे सर्वेक्षण शुल्कात सवलत देण्याची विनंती करण्यात आली होती. या विनंतीवर सकारात्मक विचार करून CRRI ने सप्टेंबर 2025 मध्ये सुधारित प्रस्ताव महापालिकेकडे पाठवला असून त्यात अनुदान व शुल्क सवलतींचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे ट्रॅफिक सर्वेक्षण प्रत्यक्ष सुरू होण्यासाठी महत्त्वाचा टप्पा पार झाला आहे.
या पार्श्वभूमीवर, सवलत मिळाल्यानंतर उर्वरित 82 लाख साठ हजार रुपयांचे सर्वेक्षण शुल्क नांदेड जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर करून महापालिकेला मदत म्हणून वर्ग करावे, अशी मागणी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी पालक मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीकडे औपचारिकरित्या केली आहे. या निर्णयामुळे महापालिकेवरील आर्थिक भार कमी होऊन शहराला उच्च दर्जाच्या वाहतूक व्यवस्थापन अभ्यासाचा थेट लाभ मिळणार आहे.
या निर्णयामुळे नांदेड महानगराच्या पर्यटन विकासाला नवी उमेद प्राप्त होईल, असा विश्वास खा. डॉ. अजित गोपछडे यांनी व्यक्त केला आहे. सुधारीत वाहतूक व्यवस्था धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या मार्गांच्या सुलभीकरणासाठी आणि शहराच्या पर्यटन क्षमतेच्या वृद्धीसाठी निर्णायक ठरेल, असेही त्यांनी नमूद केले आहे.
नांदेडचे भविष्यातील वाहतूक नियोजन, पर्यटन व्यवस्थापन आणि शहराच्या गतिशीलतेसाठी हा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. खासदार डॉ. गोपछडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे नांदेड शहराच्या ट्रॅफिक विकासाची दिशा आता अधिक वेगाने आणि वैज्ञानिक पद्धतीने पुढे जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
नांदेडसाठी सीआरआरआय ट्रॅफिक सर्वेक्षण मार्गी : खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश

0Share
Leave a reply












