राहुरी प्रतिनिधी / सोमनाथ वाघ : दत्त जयंतीनिमित्त मानोरी येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रात सुरू झालेल्या गुरुचरित्र पारायण सप्ताहाला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून परिसर भक्तिभावाने न्हाऊन निघाला आहे. सप्ताहातील प्रमुख आकर्षण ठरलेला चंडीयाग सोहळा शुक्रवारी मोठ्या भक्तिभावात पार पडला. दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रात पारायणवाचन, अभिषेक, भूपाळी, औदुंबर प्रदक्षिणा यांसारखे पारंपरिक विधी संपन्न झाल्यानंतर यज्ञमंडपात दिव्य आणि ऊर्जादायी चंडीयागाची पूजा करण्यात आली. गुरुचरित्र पारायण व ज्ञानयज्ञाच्या प्रारंभी ग्रामदेवतेचा सन्मान करून अग्निस्थापना विधी पार पडले. नित्य-स्वाहाकार, गणेशयाग, गीताई याग, स्वामीयाग यांसारख्या विविध विधीनंतर कुलदेवीच्या सन्मानार्थ भव्य चंडीयागाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सेवेकऱ्यांचा उल्लेखनीय सहभाग पाहायला मिळाला.
केंद्रात सध्या दुर्गा सप्तशती, स्वामी चरित्र, मल्हार सप्तशती पारायण, अखंड नामयज्ञ व माळजप यांसारखे विविध अध्यात्मिक उपक्रम दिवसरात्र सुरू असून संपूर्ण परिसर भक्तिभाव व अध्यात्मिक उर्जेने भारलेला आहे. विशेष म्हणजे, पारायणात महिलांचा मोठ्या उत्साहाने सहभाग असून विविध गटांद्वारे सामूहिक वाचन आयोजित करण्यात आले आहे.
दरम्यान, मानोरी परिसरातील रेणुका माता मंदिरासमोरही स्वामी समर्थ पारायणाला उत्साहपूर्ण सुरुवात झाली आहे. विजया बाचकर, विजया पोटे, वैशाली थोरात, शिवानी आढाव, मनिषा आढाव, रेखा वाघ, मयुरी वाकचौरे, स्वाती वाघ, निर्मला आढाव, देवयानी आढाव, वैशाली आढाव, वैष्णवी थोरात, शुभांगी कोहकडे, कविता आढाव, वंदना काळे, निता आढाव, साखरबाई तनपुरे, जयश्री खुळे, सुरेखा शिंदे आदी महिला भाविक पारायण वाचनात उत्साहाने सहभागी होत आहेत.
भाविकांच्या वाढत्या सहभागामुळे आगामी दिवसांतही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती केंद्राकडून देण्यात आली. तसेच त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या अन्नदान उपक्रमासाठी मानोरी केंद्रातर्फे वर्गणी संकलन सुरू असल्याचेही कळविण्यात आले.
मानोरीत स्वामी समर्थ दत्तजयंती उत्सवात भक्तीमय जल्लोष ; चंडीयाग सोहळ्याने परिसर भाविकभावाने उजळला

0Share
Leave a reply












