प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राज्यभर चर्चेत आलेल्या आणि मागील विधिमंडळ अधिवेशनातही गाजलेल्या शनिशिंगणापूर देवस्थान अॅप घोटाळ्याप्रकरणी अखेर सायबर पोलिसांनी निर्णायक कारवाई केली आहे. गुरुवारी (४ डिसेंबर) रात्री देवस्थानचे दोन कर्मचारी — सचिन शेटे आणि संजय पवार — यांना अटक करण्यात आली. आज (शुक्रवार) दोघांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अॅप घोटाळ्याबाबत शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो तपासासाठी सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सागर ढिकले तपास करत आहेत. देवस्थानकडील अधिकृत तीन अॅप्स व्यतिरिक्त आणखी चार बेकायदेशीर अॅप आढळून आल्याने या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित झाली आहे.
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, बेकायदेशीर अॅपच्या माध्यमातून भक्तांकडून जमा झालेल्या काही देणग्या थेट देवस्थानच्या दोन्ही कर्मचार्यांच्या वैयक्तिक बँक खात्यांमध्ये वळवण्यात आल्या होत्या. यामुळे मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे संकेत मिळत आहेत. पोलिसांनी विश्वस्त, कर्मचारी आणि पुजारी यांची चौकशी केली असून संशयास्पद व्यवहार झालेली बँक खातीही तपासण्यात आली आहेत. अॅपच्या माध्यमातून पैशांची ये-जा नेमकी कशी झाली आणि निधी कोणाकडे पोहोचला याचा तपास सुरू आहे.
सायबर पोलिसांनी दोन्ही आरोपींना रात्री उशिरा अटक करून अधिक चौकशी सुरू केली आहे. त्यांच्या पुढील जबाबांवर या गुन्ह्याचा तपास मोठ्या प्रमाणात अवलंबून असून, आता या प्रकरणातील इतरांचा सहभाग उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उशिरा का होईना, पण कारवाईला सुरुवात झाल्याने अॅप घोटाळ्याच्या तपासाला गती मिळणार आहे.
शनिशिंगणापूर अॅप घोटाळा प्रकरणात सायबर पोलिसांची मोठी कारवाई, देवस्थानचे दोन कर्मचारी अटक; आज न्यायालयात हजर

0Share
Leave a reply












