राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित सत्कार समारंभात बोलताना नवनियुक्त कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी शेतीसमोरील बदलत्या आव्हानांचा उल्लेख करत शाश्वत शेती संशोधनावर अधिक भर देण्याची गरज व्यक्त केली.“बदलत्या हवामानाचा परिणाम शेतीवर मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. जमिनीचे आरोग्य खालावत असून पिकांची उत्पादकता घटत आहे. सेंद्रिय व नैसर्गिक शेतीसोबत शाश्वत शेती या विषयावर सखोल संशोधनाची गरज आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे देशातच नव्हे तर विदेशातही मोठे नाव आहे. या विद्यापीठात काम करणे हा माझ्यासाठी सार्थ अभिमानाचा विषय आहे,” असे त्यांनी सांगितले.
या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अकोले येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ व राहुरी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद गडाख होते. या प्रसंगी व्यासपीठावर सौ. मंदाकिनी गडाख, सौ. सुरुची खर्चे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, नियंत्रक सदाशिव पाटील, अभियंता मिलिंद ढोके, प्रभारी कुलसचिव विजय पाटील, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश कडू, डॉ. कौस्तुभ खर्चे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे मार्गदर्शन करताना डॉ. खर्चे म्हणाले, “विद्यापीठाची विद्यमान उंची कायम ठेवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने पूर्ण क्षमतेने प्रयत्न करू. समर्पण वृत्तीने काम केल्यास राज्यातील शेतकऱ्यांचे तसेच राज्याच्या कृषी क्षेत्राचे सर्वांगीण विकास साधता येईल. पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता व रिमोट सेंसिंगसारख्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा विद्यापीठात अधिक वापर केला जाईल.” तसेच कुलगुरू पदासाठी संधी दिल्याबद्दल त्यांनी राज्यपालांचे आभार मानले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. शरद गडाख म्हणाले, “महात्मा फुले कृषि विद्यापीठाने आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी 321 पेक्षा जास्त वाण, 55 कृषि यंत्रे व 2000 पेक्षा जास्त तांत्रिक शिफारशी उपलब्ध करून दिल्या आहेत. भविष्यातील संशोधन करताना शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून काम करणे आवश्यक आहे. सध्या विद्यापीठात 65 टक्के जागा रिक्त असून निधीही अपुरा मिळतोय. विद्यापीठ आत्मनिर्भर व्हायचे असल्यास बिजोत्पादन व विविध कृषि निविष्ठांचे उत्पादन वाढविण्यासोबतच नव्या प्रकल्पांना मंजुरी मिळवणे अत्यावश्यक ठरणार आहे,” असे त्यांनी सांगून सर्वांनी एका ध्येयाने काम करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांनी केले. यावेळी डॉ. साताप्पा खरबडे, डॉ. गोरक्ष ससाणे, डॉ. प्रशांत बोडके, डॉ. प्रकाश कडू, इंजि. मिलिंद ढोके, डॉ. नितीन दानवले व डॉ. महावीरसिंग चौहान यांनी मनोगत व्यक्त केले. कृषि विज्ञान संकुल काष्टीचे प्रमुख डॉ. सचिन नांदगुडे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, कृषिभूषण सुरसिंग पवार यांच्यासह अकोला व दापोली कृषि विद्यापीठातील अधिकारी, राहुरी विद्यापीठातील सर्व सहयोगी अधिष्ठाता, अधिकारी, निवृत्त शास्त्रज्ञ, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी तर आभार प्रदर्शन विजय पाटील यांनी केले.
राहुरी कृषि विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी स्वीकारला पदभार, “कृषि विद्यापीठात काम करणे याचा सार्थ अभिमान आहे” – कुलगुरू डॉ. विलास खर्चे

0Share
Leave a reply












