राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ ) : राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत चोरीच्या गाड्यांचा वापर वाढत असल्याची माहिती समोर आल्यानंतर राहुरी पोलिसांनी विना नंबर प्लेट वाहनांवर धडक तपासणी मोहीम राबवली. आज दिनांक 03 डिसेंबर 2025 रोजी घेतलेल्या या विशेष मोहिमेत तब्बल 47 दुचाकी वाहनं विना नंबर प्लेट असल्याचे आढळले. सदर वाहनांवर एकूण 29,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला असून संबंधित दुचाकी धारकांना तात्काळ नंबर प्लेट बसविण्याचे आदेश देण्यात आले. नंबर प्लेट बसविल्यानंतरच वाहनं मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आली.
राहुरी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की आपल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर पुढील व मागील दोन्ही नंबर प्लेट अनिवार्यपणे लावाव्यात, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल. चोरीचे वाहन शोधण्यात नंबर प्लेट मोठी मदत ठरते, असेही पोलिसांनी स्पष्ट केले. ही मोहीम पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी देवदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि शिरसाट, पोसई फडोळ, पोसई आहेर, पोसई सप्तर्षी, स.फो. आव्हाड, पोहेकॉ ठोंबरे, पोहे/कॉ. दरेकर फुलमाळी, तसेच चालक पठाण, चालक साखरे व राहुरी–देवळाली होमगार्ड पथकाने ही कारवाई केली.
नवीन वाहनांवर नंबर प्लेट नसतानाही ती शोरूममधून रस्त्यावर उतरवली जात असल्याचेही तपासात निष्पन्न झाले. याबाबत शोरूम संचालकांविरोधात आरटीओमार्फत कारवाईसाठी पत्र पाठविण्यात येणार आहे. तसेच, अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यासाठी देऊ नये, असे कडक आवाहन पोलिसांनी केले आहे. अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवताना आढळल्यास त्यांच्या पालकांवर थेट कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
चोरीच्या गाड्या शोधण्यासाठी राहुरी पोलिसांनी राबविली विशेष मोहिम 47 विना नंबर प्लेट गाड्यांवर दंडात्मक कारवाई – 29 हजार रुपयांचा दंड वसुल

0Share
Leave a reply












