SR 24 NEWS

सामाजिक

युवक महोत्सवामुळेच घडलो, जीवनात गुरूंचे योगदान अविस्मरणीय – सिनेअभिनेता योगेश शिरसाट

Spread the love

तुळजापूर, दि.१० (चंद्रकांत हगलगुंडे) – “युवक महोत्सव हा कलांना नवजीवन देणारा, प्रेरणा देणारा असून अशक्य ते शक्य करण्यामध्ये गुरुजनांचे योगदान अविस्मरणीय आहे,” असे प्रतिपादन सिनेअभिनेता तथा टीव्ही स्टार योगेश शिरसाट यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत जवाहर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे धाराशिव जिल्हा युवक महोत्सव पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण होते. व्यासपीठावर सिनेअभिनेत्री रूपलक्ष्मी चौगुले, सरपंच रामचंद्र आलूरे, अॅड. लक्ष्मीकांत पाटील, प्रा. डॉ. अंकुश कदम, बसवराज मंगरुळे, प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी, डॉ. कैलास अंभुरे, उपप्राचार्य मल्लिनाथ लंगडे आदी मान्यवर उपस्थित होते. युवकांना मार्गदर्शन करताना शिरसाट म्हणाले की, “ग्रामीण भागातच खरे कलाकार व टॅलेंट निर्माण होते. न्यूनगंड बाजूला सारून विविध क्षेत्रांत स्वतःला अर्पण केल्याशिवाय प्रगती अशक्य आहे. गुरुजनांचे योगदान जीवनात श्रेष्ठ आहे. व्यापक दृष्टिकोन ठेवून संवेदनशीलतेसह उंच भरारी घेणे हेच युवकांचे ध्येय असावे.”

यावेळी रूपलक्ष्मी चौगुले यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, “ग्रामीण भागात कला ठासून भरलेली असून तिचा सुगंध सात समुद्रापार दरवळतो. आई-वडिलांच्या पाठबळामुळे आत्मविश्वास दृढ होतो. युवकांनी अडचणींवर मात करून ध्येयगाठीसाठी पुढे यावे,” असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमात सहभागी झालेल्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत नाडापुढे तसेच सिनेअभिनेते व दिग्दर्शक दिलीप भोसले यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी यांनी केले. सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले. प्रा. मल्लिनाथ बिराजदार व डॉ. विवेकानंद वाहुळे यांनी आभार मानले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!