राहुरी (प्रतिनिधी) १० सप्टेंबर – नगर-मनमाड महामार्गाची दुरवस्था आणि त्यावरून होणारे जीवघेणे अपघात यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष उसळला आहे. याच पार्श्वभूमीवर नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने आज बुधवार, दि. १० सप्टेंबर रोजी राहुरी फॅक्टरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जोरदार रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
महामार्गावरच्या असंख्य खड्ड्यांमुळे आतापर्यंत शेकडो नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक अपघातग्रस्तांना कायमचे अपंगत्व आले आहे. रस्त्यावरील निकृष्ट दर्जाचे काम, देखभालीकडे होत असलेले दुर्लक्ष आणि प्रशासनाची उदासीन भूमिका याबद्दल संतप्त नागरिकांनी निषेध व्यक्त केला. नागरिकांच्या जीवित सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीचे सदस्य तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. घोषणाबाजी करत त्यांनी महामार्गावर ठिय्या मांडला.
दरम्यान, आंदोलन सुरू असताना रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे शासकीय वाहन आले. पोलिसांनी आंदोलकांना बाजूला होण्यास सांगितले मात्र संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन थांबवून धरले. नंतर पोलिसांनी मध्यस्थी करून वाहनास बंदोबस्तात सूर्यानगर मार्गे ताहराबाद रोडकडे वळवले.
या घटनेमुळे आंदोलनाला अधिक तीव्र वळण लागले असून नागरिकांचा रोष स्पष्टपणे जाणवला. स्थानिक प्रशासनाने या गंभीर प्रश्नावर तातडीने पावले न उचलल्यास आंदोलन अधिक उग्र करण्याचा इशारा समितीने दिला आहे.
नगर-मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात राहुरी फॅक्टरी येथे रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या रास्तारोको आंदोलन, खड्डेमय रस्त्यामुळे शेकडो बळी ; संतप्त आंदोलकांनी रोखले जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन,

0Share
Leave a reply












