तुळजापूर दि.१० (चंद्रकांत हगलगुंडे) –”वाढदिवस म्हणजे हार-तुरे, पार्टी आणि दिखाऊ खर्च” ही पद्धत मोडून काढत अणदूर येथील पाच मान्यवरांनी समाजोपयोगी कार्याचा आदर्श ठेवला आहे. २५ ऑगस्ट रोजी श्री सुहास कंदले, श्री शिवाजी कांबळे, उद्योजक श्री करबसप्पा धमुरे, प्रसिद्ध डॉक्टर श्री पंकज घुगे आणि तरुण कार्यकर्ते कु. राजकुमार गाढवे या पाच जणांचा वाढदिवस एकाच दिवशी होता. या निमित्ताने त्यांनी समाजहिताचे उपक्रम राबवून एक आगळीवेगळी परंपरा घालून दिली.
या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा, महाविद्यालयीन युवकांसाठी वक्तृत्व स्पर्धा आणि महिलांसाठी गौरी देखावा स्पर्धा घेण्यात आल्या. या उपक्रमात अणदूर नगरीतील ८० ते ९० युवकांनी उत्साहाने योगदान दिले.सामान्य ज्ञान स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. अणदूर केंद्रावर ५८४ आणि तिवारी केंद्रावर १५४ असे एकूण ७३८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ५वी ते ७वी आणि ८वी ते १०वी असे दोन गट करून स्पर्धा घेण्यात आली.
महाविद्यालयीन युवकांसाठी झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत ४१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाने सभागृह मंत्रमुग्ध झाले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. संतोष पवार, प्रा. विनायक अहंकारी आणि कवी-लेखक महादेव पाटील यांनी काम पाहिले. महिलांसाठी आयोजित गौरी देखावा स्पर्धेलाही पहिल्याच वर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल ५५ महिलांनी आपल्या देखाव्यांचे व्हिडिओ पाठवले. परीक्षक म्हणून सौ. सरिता भगीरथ कुलकर्णी, सौ. पौर्णिमा कुलकर्णी आणि श्री राजकुमार घुगे यांनी जबाबदारी पार पाडली.
या अभिनव उपक्रमामुळे समाजात एक आदर्श निर्माण झाला आहे. वाढदिवसाच्या खर्चातून समाजोपयोगी कार्य करता येते, याचे हे उत्तम उदाहरण ठरले असून परिसरातून या पाच जणांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अणदूर येथे वाढदिवसानिमित्त युवकांचा अभिनव उपक्रम : समाजोपयोगी स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

0Share
Leave a reply












