नेवासा (प्रतिनिधी) : कोपरगाव तालुक्यातील अंजनापुर येथील ग्रामसेवक बाजीराव बाचकर यांनी अधिकाऱ्यांच्या सततच्या मानसिक व आर्थिक छळाला कंटाळून 8 ऑगस्ट रोजी करजगाव (ता. नेवासा) येथील राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या सुसाईड नोटच्या आधारे कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी आणि विस्तार अधिकारी बबन वाघमोडे यांच्या विरोधात सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामसेवक बाजीराव बाचकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत स्पष्ट केले की, “गटविकास अधिकारी संदीप दळवी आणि विस्तार अधिकारी बबन वाघमोडे माझा सतत मानसिक व आर्थिक छळ करत आहेत. हा त्रास सहन न झाल्याने मी आत्महत्या करीत आहे. माझ्या मृत्यूला हेच दोघे जबाबदार आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी.”
घटनेच्या काही मिनिटांपूर्वीच बाचकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला होता. मात्र त्यांनी कॉल न उचलल्याने त्यांनी आपल्या सहकारी ग्रामसेवकाशी संवाद साधत छळ होत असल्याचे सांगून आत्महत्येचा इशाराही दिला होता. या संभाषणाचे रेकॉर्डिंग असल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. 8 ऑगस्ट रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास बाचकर घरातच बेशुद्ध पडलेले दिसले. पत्नी प्रमिला यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना तत्काळ अहिल्यानगर येथील रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचाराआधीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
यानंतर 10 ऑगस्ट रोजी पत्नी प्रमिला यांच्या हाती बाचकर यांनी लिहिलेली सुसाईड नोट लागली. या चिठ्ठीत अधिकाऱ्यांचा उल्लेख असल्याने कुटुंबीयांनी सातत्याने कारवाईची मागणी केली होती. 16 ऑगस्टपर्यंत गुन्हा दाखल न झाल्याने नातेवाईकांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे व जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन देत कठोर कारवाईची मागणी केली. परंतु नऊ दिवस उलटूनही गुन्हा दाखल होत नसल्याने कुटुंबियांनी व नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने तसेच 17 ऑगस्ट रोजी दशक्रिया विधी घोडेगाव चौफुला (अहिल्यानगर–संभाजीनगर महामार्गावर) व तेरावा विधी कोपरगाव पंचायत समिती आवारात करण्याचा देण्यात आला होता.
नऊ दिवसानंतर अखेर पोलिस प्रशासनास जाग आली असून अखेर 16 ऑगस्ट रोजी रविवारी रात्री उशिरा सुसाईड नोटच्या आधारे दोन्ही अधिकाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस अधिक तपास करीत आहेत.पत्नी प्रमिला बाचकर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, “माझ्या पतीला अन्यायकारक छळ करून आत्महत्या करण्यास भाग पाडले गेले. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी. या घटनेने पंचायत समिती प्रशासनातील छळ आणि दबावाचे अंधारलेले वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.
बाचकर ग्रामसेवक आत्महत्या प्रकरणी कोपरगावचे गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्यावर 9 दिवसानंतर अखेर गुन्हे दाखल, अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची पत्नीची मागणी

0Share
Leave a reply












