राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी / आर. आर. जाधव : नगर-मनमाड महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, आज पुन्हा एका तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वांबोरी फाटा परिसरात आज सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान झालेल्या अपघातात सागर साहेबराव रंधवे (रा.अगस्थान, ता. पाथर्डी,) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर रंधवे (वय वर्ष 28) हे वरवंडी येथे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी आला होता तो बहिणीला भेटल्यानंतर सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान परत नगरच्या दिशेने आपल्या दुचाकी (क्र. 16 DQ 7959) वरून जात असताना वांबोरी फाटा येथे खड्ड्यामुळे त्याचा तोल गेल्याने तो रस्त्यावर पडला असता मागून येणाऱ्या अज्ञात चारचाकी मालवाहतूक वाहनाचे चाक थेट त्यांच्या डोक्यावरून गेल्याने ते जागीच ठार झाला. अपघातानंतर अज्ञात वाहनाचा चालक पसार झाला असून, घटनास्थळाचे दृश्य अंगावर शहारे आणणारे होते.
गेल्या पंधरा दिवसांत नगर-मनमाड महामार्गावर हा पाचवा बळी ठरला आहे. त्यामुळे हा रस्ता प्रत्यक्षात मृत्यूचा सापळा बनल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.विशेष म्हणजे, आज 10 सप्टेंबर रोजी सकाळीच नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी राहुरी फॅक्टरी येथे नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन छेडले होते. आंदोलन संपल्यानंतर काही तासांतच पुन्हा एका तरुणाचा बळी गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, महामार्गाची दुरवस्था, वाहनांचा वेग आणि शासन-प्रशासनाची उदासीनता यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. तातडीने रस्ता दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
नगर-मनमाड महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच ; वांबोरी फाटा येथे तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, १५ दिवसांत पाचवा बळी

0Share
Leave a reply












