SR 24 NEWS

अपघात

मानोरी परिसरात पुन्हा अपघात — चार दिवसांत दुसरी घटना, नागरिकांमध्ये वाढत्या अपघातांमुळे वाढली चिंता

Spread the love

राहुरी वेब प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) : मानोरी महाडूक सेंटर रोडवरील खिळे वस्ती व ठुबे वस्तीदरम्यान गुरुवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या भीषण कार अपघातात दोन तरुण जखमी झाले. मानोरीकडून माहेगावकडे जाणाऱ्या चारचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारमध्ये पलटी झाली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून, दोघांनाही किरकोळ दुखापती झाल्या आहेत. त्यांना तातडीने मानोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते अक्षय पोटे, अनिल ठुबे, सोमा थोरात, आकाश पोटे तसेच खिळे वस्ती तरुण मंडळाचे सदस्य धावून आले आणि तत्काळ मदतकार्य हाती घेतले. त्यांनी जखमींना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवले. स्थानिक नागरिकांनीही वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.

दरम्यान, केवळ चार दिवसांपूर्वी (रविवारी) याच रस्त्यावर झालेल्या आणखी एका अपघातानंतर ही दुसरी घटना घडल्याने परिसरात भीतीचे सावट निर्माण झाले आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे मानोरी–माहेगाव मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, या रस्त्यावरील असमान पृष्ठभाग, चुकीचे गटार बांधकाम आणि प्रकाशव्यवस्थेचा अभाव हेच अपघातांचे मूळ कारण आहे.

नागरिकांनी या ठिकाणाला ‘अपघातप्रवण क्षेत्र’ घोषित करून, रस्ता दुरुस्ती, साईड गटार सुधारणा आणि आवश्यक ती प्रकाशव्यवस्था तातडीने उभारण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. “प्रशासनाने तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत, तर आणखी मोठा अनर्थ होऊ शकतो,” अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. एस आर ट्वेंटी फोर न्यूज करिता सोमनाथ वाघ राहुरी


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!