SR 24 NEWS

अपघात

शनीशिंगणापूर रस्त्यावर वंजारवाडी येथे भीषण अपघात; बाप–लेकीचा जागीच मृत्यू, आई–मुलगा बचावले, भाऊबीजवरून परतताना ब्राह्मणी येथील पाटोळे कुटुंबावर काळाचा घाला

Spread the love

ब्राम्हणी प्रतिनिधी (ज्ञानेश्वर सुरशे) : ऐन सणासुदीच्या आनंदावर पाणी फेरणारी दुर्दैवी घटना सोमवारी (दि. 27 ऑक्टोबर) दुपारी शनीशिंगणापूर रस्त्यावर वंजारवाडी बसस्टँड येथे घडली आहे. राहुरी – शनीशिंगणापूर रस्त्यावर वंजारवाडी बसस्टँड परिसरात झालेल्या भीषण अपघातात बाप–लेकीचा जागीच मृत्यू झाला असून आई–मुलगा सुदैवाने बचावले. या दुर्घटनेने ब्राह्मणी परिसरात शोककळा पसरली आहे.

मृतांमध्ये राहुल नवनाथ पाटोळे (वय 32) आणि त्यांची लहान मुलगी रिया राहुल पाटोळे (वय 3) यांचा समावेश आहे. तर पत्नी सोनाली राहुल पाटोळे आणि मुलगा चैतन्य राहुल पाटोळे हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल पाटोळे हे आपल्या पत्नी, मुलगी आणि मुलासह सोनईजवळील धनगरवाडी येथे सासुरवाडीस गेले होते. भाऊबीज साजरी करून सोमवारी दुपारी ब्राह्मणीकडे परतताना वंजारवाडी बसस्टँड चौकात त्यांच्या दुचाकीला भरधाव पिकअप वाहनाने जोराची धडक दिली. धडकेचा आवाज आणि दृश्य इतके भयंकर होते की प्रत्यक्षदर्शींचा अक्षरशः थरकाप उडाला.

धडकेमुळे दुचाकीवरील राहुल पाटोळे आणि त्यांची लहान मुलगी रिया घटनास्थळीच ठार झाले, तर आई–मुलगा किरकोळ जखमी अवस्थेत बचावले. अपघाताची माहिती मिळताच ब्राह्मणीतील पाटोळे परिवारातील सदस्य घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी नेवासा येथे हलवले.

राहुल पाटोळे यांच्या पश्चात आई–वडील, पत्नी, मुलगा आणि दोन बहिणी असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण ब्राह्मणी परिसरात हळहळ व्यक्त होत असून सणासुदीच्या काळात पाटोळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या चारचाकी वाहनचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!