तुळजापूर (प्रतिनिधी: चंद्रकांत हगलगुंडे) : जीवनात वाटचाल करताना आदर्श व्यक्तिमत्त्वांचे अनुकरण करणे आवश्यक आहे. श्रीमंत मुळे गुरुजींचा जीवनप्रवास व कार्य आदर्शवत असून, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवले तर युवा पिढी निश्चितच जीवनात यशस्वी आणि सार्थक ठरेल, असा विश्वास माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केला.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा अणदूर येथील ज्येष्ठ व श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व श्रीमंत मुळे गुरुजी यांच्या चंद्रदर्शन सोहळा व अमृत महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर नीलकंठेश्वर मठाचे अधिपती शिवयोगी शिवाचार्य महास्वामी, जेवळीचे गंगाधर महास्वामीजी, ह.भ.प. बाळासाहेब चव्हाण, महादेवप्पा आलूरे, दीपक दादा आलूरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी मंत्री चव्हाण पुढे म्हणाले की, “क्षणिक सुखासाठी आज समाजातील माणसे एकमेकांपासून दूर जात आहेत. पण श्रीमंत मुळे गुरुजींसारख्या थोर व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चालल्यास जीवन खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण होईल. सत्काराला उत्तर देताना श्रीमंत मुळे गुरुजी भावनाविवश होत म्हणाले की, “जन्मभूमी, आई-वडिलांचे सुसंस्कार आणि गावकऱ्यांचे सहकार्य यामुळेच आज माझे कार्य फलद्रूप झाले आहे. विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम आज सार्थकी लागले, हीच खरी समाधानाची भावना आहे.”
Leave a reply













