विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील हे राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून, हा भव्य सोहळा ६ नोव्हेंबर रोजी पारनेर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून, त्यांच्या उपस्थितीत झावरे पाटील यांचा पक्षप्रवेश होणार आहे. या घटनेमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुजित झावरे पाटील यांचा पारनेर सह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मतदारसंघात फार मोठा दांडगा जनसंपर्क आहे. झावरे यांचा पारनेर तालुक्यातील तळागाळातील जनतेमध्ये संपर्क असून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीला खुप मोठी त्यांची उणीव भासणार हे मात्र नक्कीच, पक्षाच्या वाढीसाठी प्रमाणिक काम केले. यामुळे त्यांच्याप्रती अहमदनगर जिल्ह्यामध्ये खुप मोठा आदर आहे. मात्र पक्षासाठी एवढे प्रमाणिक काम करूनही त्यांच्यावर सतत अन्याय होत असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्ताव्यस्ता निर्माण झाली होती. त्यातच आमदार काशिनाथ दाते ही त्यांना दुय्यम वागणूक देत असल्याचे सुजित झावरे पाटील यांनी जाहीरपणे सांगितले आहे. जरी त्यांच्या जाण्याने फरक पडणार नाही असे म्हणले जात असले तरी मात्र पक्ष संघटनेवर याचा खूप मोठा परिणाम होईल हे सर्वसामान्य जनतेकडून बोलले जात आहे.
सुजित झावरे पाटील हे पारनेर तालुक्यातील एक प्रभावी मात्तबर नेते आहेत. त्यांचा तरुणांमधील जनसंपर्क आणि सामाजिक कार्यामुळे त्यांना मोठा पाठिंबा आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेना (शिंदे गट) ला तालुक्यात बळ मिळण्याची अपेक्षा आहे. हा प्रवेश स्थानिक पातळीवरील राजकीय गणिते बदलण्यास कारणीभूत ठरू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. विशेषतः आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
या सोहळ्याच्या तयारीसाठी शिवसेना (शिंदे गट) ने जोरदार तयारी सुरू केली आहे. पारनेर येथील कार्यक्रमस्थळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यावेळी झावरे पाटील यांच्यासोबत त्यांचे अनेक समर्थकही पक्षात प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
या प्रवेशामुळे पारनेर तालुक्यातील राजकीय शक्तीप्रदर्शनाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत येथील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित असेल. सुजित झावरे पाटील यांच्या या निर्णयामुळे शिवसेना शिंदे गटाला तालुक्यात नवी ताकद मिळेल,असा विश्वास पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी व्यक्त केला आहे.
पारनेरमध्ये राजकीय भूकंप! सुजित झावरे पाटील सोडणार राष्ट्रवादी, हाती घेणार धनुष्यबाण, सुजित झावरे पाटील ६ नोव्हेंबर रोजी शिंदेसेनेत प्रवेश करणार

0Share
Leave a reply












