SR 24 NEWS

सामाजिक

“राहुरी पोलिसांचे ‘ऑपरेशन मुस्कान पार्ट-2’ सुरू – मुलींच्या अपहरण व सायबर गुन्हे प्रतिबंधासाठी शाळांमध्ये जागरूकता अभियान”

Spread the love

राहुरी वेब प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) : राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने ‘ऑपरेशन मुस्कान पार्ट-1’ अंतर्गत मागील दीड वर्षात आतापर्यंत 91 अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. उर्वरित 11 मुलींचा शोध युद्धपातळीवर सुरू असून, अशा प्रकारचे गुन्हे पुन्हा घडू नयेत, यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान पार्ट-2’ या नव्या मोहिमेअंतर्गत जागरूकता अभियान सुरू करण्यात आले आहे.या अभियानात तालुक्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधून मुलींचे अपहरण कसे घडते, त्याला प्रतिबंध कसा घालता येतो, तसेच सायबर गुन्हे आणि मोबाईलच्या गैरवापराविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे.

या उपक्रमाचा भाग म्हणून सात्रळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या कडू पाटील महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.या प्रसंगी रयत संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, अक्षर मानव वाचनालयाचे संस्थापक पंकज कडू पाटील, प्राचार्य सीताराम गारुडकर, मुख्याध्यापिका सौ. विद्या ब्राह्मणे, पर्यवेक्षिका सौ. हेमलता साबळे, शिक्षिका अश्विनी जाधव (कडू) तसेच शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना पोलीस निरीक्षक संजयजी ठेंगे यांनी केले मार्गदर्शन.

कार्यक्रमात शंभर पुस्तके वाचून रेकॉर्ड करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी वाचलेल्या पुस्तकांवर हितगुजही झाले.‘मुस्कान-2 गुन्हे प्रतिबंध उपाय योजना’ अंतर्गत असेच जागरूकता उपक्रम तालुक्यात विविध ठिकाणी राबवले जाणार आहेत.

या अभियानाचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे करीत आहेत.

 


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!