राहुरी (प्रतिनिधी सोमनाथ वाघ) : नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांच्या आरक्षणामुळे पुन्हा एकदा वांबोरी व बारागाव नांदूर जिल्हा परिषद गट चर्चेत आले आहेत. गेल्या अनेक पंचवार्षिक निवडणुकांत सातत्याने बारागाव नांदूर गटावर वेगवेगळे आरक्षण लागू होत असून, अद्यापही हा गट सर्वसामान्य प्रवर्गासाठी खुला झालेला नाही. या पार्श्वभूमीवर युवा नेते धीरज पानसंबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत “एका गटावरच वारंवार आरक्षण आणि दुसरा कायम खुला कसा?” असा थेट सवाल उपस्थित केला आहे.
धीरज पानसंबळ म्हणाले की, “गेल्या ४० वर्षांपासून वांबोरी जिल्हा परिषद गट सर्वसामान्य प्रवर्गासाठी खुला आहे. दुसरीकडे, बारागाव नांदूर गट एकदाही खुला न झाल्यामुळे सामान्य जनतेमध्ये रोष निर्माण झाला आहे. वांबोरी गटात अनुसूचित जाती-जमातीचे लोक नाहीत का? किंवा बारागाव नांदूरमध्ये इतर प्रवर्गातील नागरिक नाहीत का? सातत्याने एका गटावर आरक्षण लादले जाणे हा सामाजिक न्यायाचा प्रश्न नसून राजकीय समीकरणांचा परिणाम आहे,” असा आरोप त्यांनी केला.
पुढे ते म्हणाले की, “जर जिल्हा परिषद गट आरक्षित असेल, तर संबंधित भागातील पंचायत समिती गण खुला ठेवावा. मात्र वास्तवात दोन्हीही गण आरक्षित ठेवल्याने नवख्या व सामान्य पार्श्वभूमीतून राजकारणात येऊ पाहणाऱ्या युवकांना संधी मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वक्षमतेला आणि समाजकार्यासाठीच्या इच्छेलाही गंड बसतो.”
“निवडणूक आयोग आणि प्रशासनाने मागील निवडणुकांचा आराखडा तपासावा आणि एखाद्या गटावर वारंवार लादले जाणारे आरक्षण थांबवावे,” अशी ठाम मागणी धीरज पानसंबळ यांनी केली.
बारागाव नांदूर गटावर पुन्हा आरक्षण; युवा नेते धीरज पानसंबळ यांचा संतप्त प्रश्न – “एकाच गटावर वारंवार आरक्षण का?”

0Share
Leave a reply












