अहिल्यानगर वेब प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. तब्बल 7 वर्षे पदावर असलेले आणि विशेष म्हणजे पक्षफुटनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ऑफर आल्यानंतरही पवारांसोबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत ठामपणे राहिलेले फाळके यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावरच पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षात नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून आणि कौंटुंबिक कारणावरून पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठविला आहे. पद सोडत असले तरी पक्षाचा राजीनामा त्यांनी दिलेला नाही. आपण दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.t
राजेंद्र फाळके कर्जत तालुक्यातील म्हणजे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातील आहेत. असे असले तरी आमदार पवार यांच्याशी त्यांचे सुरवातीपासूनच फारसे पटत नसल्याचे दिसून आले. जामखेडमधील प्रमुख पदाधिकारी दत्ता वारे यांनीही अलीकडेच पक्षाचा राजीनामा दिला आहे. कर्जत तालुक्यातील फाळके सुरुवातीपासूनच ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे खंदे समर्थक राहिले. पक्षाच्या स्थापनेपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. पूर्वी जिल्हा परिषदेचे ते उपाध्यक्षही होते. तालुका पंचायत समिती, जिल्हा परिषद, स्थानिक सहकारी संस्था आणि तत्कालीन सहकारी साखर कारखान्याच्या पदांवर आणि राजकारणातही त्यांचा सक्रीय सहभाग होता.
कर्जत जामखेड मतदारसंघ खुला झाल्यानंतर त्यांना तेथून उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पक्षाने रोहित पवार यांना दोनवेळा तेथून उमेदवारी दिली. त्यानंतर पक्षाकडून आणखी काही मोठी जबाबदारी मिळेल, अशीही अपेक्षा होती. पुढे पक्षात फूट पडली. त्यावेळी फाळके यांनाही अजितदादांकडून ऑफर आली. अंबालिका कारखान्यावर त्यांची भेटही झाली होती. या सर्व घडामोडींनंतरही फाळके यांनी शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार नीलेश लंके यांना उमेदवारी देण्यापासून नव्हे तर अजित पवार यांच्याकडे गेलेल्या लंके यांना पुन्हा पवारांकडे आणण्यापासूनच फाळके यांचा मोठा वाटा होता. लंके यांच्या निवडणूक प्रचारातही फाळके यांची महत्वाची जबाबदारी होती. लंके यांचा विजय झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीतही फाळके यांनी पक्षाच्या सर्व उमेदवारांचे काम केले. मात्र, कर्जत-जामखेडमध्ये ते फारसे सक्रीय दिसले नाहीत. त्याला कारण त्यांचे आणि आमदार रोहित पवार यांचे दुरावलेले संबंध असल्याचे सांगण्यात येते.
आता जिल्हा परिषदेची निवडणूक आली आहे. त्यासाठी पक्षाची तयारी सुरू आहे. वरच्या पातळीवर बदल झाले आहेत. प्रदेशाध्यपदी जयंत पाटील यांच्या जागी शशिकांत शिंदे आले आहेत. फाळके यांचे पाटील यांच्याशीही चांगले संबंध होते. निवडणुकीच्या तयारीसाठी सध्या प्रदेश पातळीवर बैठका सुरू आहेत. दुसरीकडे पक्षांतरेही वेगाने सुरू झालेली आहेत. अशात फाळके यांनी पक्ष सोडला आहे. त्यांची पुढील भूमिका काय असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
याच महिन्यात जामखेडचे माजी सभापती दत्ता वारे यांनी आमदार रोहित पवार यांची साथ सोडली. आता त्याच मतदारसंघातील मूळचे पक्षातील आणखी एक मोठे नेते फाळके यांनीही साथ सोडली आहे. गेल्या काही काळापासून विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्यात टोकाची राजकीय स्पर्धा सुरू झाली आहे. त्यातूनच पुढील संधी लक्षात घेऊन पक्षांतरे सुरू झाली आहेत.
अहिल्यानगरमध्ये खळबळ; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचा तडकाफाडकी राजीनामा

0Share
Leave a reply












