अहिल्यानगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : अहिल्यानगर-मनमाड महामार्गावर सुरू असलेल्या दुरूस्तीच्या कामामुळे येणार्या-जाणार्या अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी दि. 21 सप्टेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली होती. मात्र, यात आणखी पुढील 15 दिवस बंदी असणार आहे. या महामार्गावर दररोज जड वाहनांची प्रचंड वर्दळ होत असल्याने मोठे अपघात होत असून दुरूस्तीच्या काळात वाहतूक कोंडी वाढून नागरिकांची गैरसोय होण्याची तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन आणखी 15 दिवस वाहतुक बंद ठेवण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे.
महामार्ग दुरूस्तीचे काम दि. 12 सप्टेंबरपासून सुरू झाले असून त्या दिवशी दुपारी 2 वाजल्यापासून ते दि. 21 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत वाहतूक बंद करण्यात आली होती. दरम्यान, दुरूस्तीचे काम पूर्ण झाले नसल्याने यात वाढ करण्यात आली आहे. दि. 21 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजल्यापासून ते दि. 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत जड वाहतूक बंद ठेवून पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. पर्यायी मार्ग पुढील प्रमाणे : अहिल्यानगरहून राहुरी – शिर्डी – मनमाड – मालेगाव – धुळे या दिशेने जाणारी वाहतूक विळद सर्कल – दुधडेरी चौक – शेंडी बायपास – नेवासा फाटा – कायगाव टोके – गंगापूर – वैजापूर मार्गे पुढे जाईल.
मनमाडहून कोपरगाव – शिर्डी – राहुरी मार्गे अहिल्यानगरकडे येणारी वाहतूक कोपरगाव – पुणतांबा फाटा – वैजापूर मार्गे इच्छित स्थळी जाईल. (कमी उंचीच्या वाहनांसाठी) कोपरगाव – पुणतांबा / बाभळेश्वर – श्रीरामपूर – नेवासा मार्गे अहिल्यानगरला येता येईल. अहिल्यानगरहून संगमनेर – नाशिककडे जाणारी जड वाहतूक कल्याण बायपास – आळेफाटा – संगमनेर मार्गे जाईल. सिन्नर – लोणी मार्गे अहिल्यानगरकडे येणारी वाहतूक संगमनेर – आळेफाटा मार्गे वळविण्यात येईल.
सदर आदेश शासकीय वाहने, अॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड व स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक कारणास्तव परवानगी दिलेल्या वाहनांवर लागू राहणार नाही. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी हा आदेश काढला आहे.
सनफार्मा चौक ते निंबळक बायपास वाहतुकीत बदल
एमआयडीसीतील निंबळक रस्त्यावरील रेणुका माता मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याने सनफार्मा चौकाकडून निंबळक बायपासकडे जाणारी व येणारी सर्व वाहतूक 3 ऑक्टोबरपर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे : सनफार्मा चौक ते निंबळक बायपास जाणार्या वाहनांसाठी मार्ग: सनफार्मा चौक – शेळके यांचा एचपी पेट्रोलपंप – एसबीआय बँक कॉर्नर – श्री स्टाईल चौक – लामखडे चौक – निंबळक बायपास. निंबळक बायपासकडून सनफार्मा चौकाकडे येणार्या वाहनांसाठी मार्ग: लामखडे चौक – श्री स्टाईल चौक – एसबीआय बँक कॉर्नर – शेळके यांचा एचपी पेट्रोलपंप – सनफार्मा चौक.
नगर-मनमाड महामार्गावर अवजड वाहनांना आणखी 15 दिवस बंदी, 5 ऑक्टोबरपर्यंत राहणार वाहतूक बंद

0Share
Leave a reply












