अहिल्यानगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी शारीरिक संबंध ठेवत शिवीगाळ, दमदाटी व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप पांडुरंग दराडे यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
तोफखाना पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत वास्तव्यास असलेल्या ३० वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. तिचे मूळ गाव हुबळी (प. बंगाल) असून, आरोपी प्रताप दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर, जि. पुणे) यांनी ऑगस्ट २०२३ पासून नोव्हेंबर २०२४ या कालावधीत लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. हे कृत्य त्यांनी पालघर येथील फार्महाऊस व फिर्यादीच्या घरातही केले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, या संबंधाबाबत फिर्यादीने आक्षेप घेताच दराडे यांनी तिला “आपल्यात जे झाले ते विसरून जा” असे सांगत शिवीगाळ केली. त्याविरोधात तिने पोलिसांत जाण्याची धमकी दिली असता, आरोपीने “तुला जे करायचे ते कर” असे म्हणत दमदाटी केली तसेच जिवे मारण्याची धमकीही दिली असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यावर एवढे गंभीर आरोप झाल्याने पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर पुढील चौकशीसाठी मनोर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या घटनेची सखोल चौकशी होणार का आणि आरोपीवर कायदेशीर कारवाई होते का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात खळबळ; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी शारीरिक संबंध; कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर गुन्हा दाखल

0Share
Leave a reply












