मानोरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) : राहुरी तालुक्यातील मानोरी येथील ग्रामदैवत श्री रेणुका माता यांच्या नवरात्र महोत्सवाला आज (२२ सप्टेंबर) पासून उत्साहात आणि भक्तिभावाने प्रारंभ झाला. श्री रेणुका भगवती संस्थान व सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट, मानोरी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला हा ११ दिवसीय नवरात्र उत्सव २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे. उत्सवाची सुरुवात आज पहाटे सहा वाजता गंगाजल कावड यात्रेने झाली. या पवित्र गंगाजलाने देवी मूर्तीचा जलाभिषेक करण्यात आला. यानंतर माहूरगड येथून आणलेल्या पवित्र ज्योतीचे मिरवणुकीने स्वागत करण्यात आले. सकाळी नऊ वाजता घटस्थापना सोहळा सौ. रंजना व श्री. भाऊराव गेणूजी आढाव (कामगार पोलिस पाटील) या दाम्पत्याच्या हस्ते संपन्न झाला.
नवरात्र उत्सवाच्या कालावधीत दररोज काकडा भजन, हरिपाठ, तिन्ही वेळा आरती, तसेच संध्याकाळी भक्तांसाठी फराळाची पंगत ठेवण्यात आली आहे. या उत्सवात बाबाराव विष्णुपंत ब्राम्हणे (भोपेबाबा) हे मंदिरात अखंड उपस्थित राहून भाविकांना अध्यात्मिक मार्गदर्शन करणार आहेत. उत्सवाचा समारोप बुधवार, १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य होमपूजनाने होणार असून, या समारोप सोहळ्याला सौ. व श्री. नामदेव पाटील (तालुका दंडाधिकारी, राहुरी) तसेच सौ. व श्री. संजय ठेंगे (पोलीस निरीक्षक, राहुरी) हे यजमान म्हणून उपस्थित राहणार आहेत.
संस्थानच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, भाविकांसाठी दर्शनाची सुविधा सुरळीत पार पडावी यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, स्वच्छता व्यवस्था, तसेच योग्य दर्शन रांगा नियोजित करण्यात आल्या आहेत. श्री रेणुका भगवती संस्थान व सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट यांच्यातर्फे सर्व भाविकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी उत्सवकाळात स्वच्छता व शांतता राखावी, तसेच अन्य भाविकांना कोणतीही अडचण होणार नाही याची दक्षता घ्यावी. अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून श्री रेणुका मातेच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Leave a reply













