SR 24 NEWS

राजकीय

बिलोली तालुक्यातील अनेक अतिवृष्टीग्रस्त गावांना खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या भेटी : शेतकऱ्यांचे दुःख घेतले जाणून ; शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी केले आश्वासित 

Spread the love

नांदेड प्रतिनिधी /धम्मदिप भद्रे : ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बिलोली तालुक्यातील अनेक गावांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खा. डॉ. अजित गोपछडे यांनी आज बिलोली तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त अनेक गावांना भेटी दिल्या. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली . यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या आणि अतिवृष्टीग्रस्तांच्या वेदना जाणून घेत शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी आश्वासित केले. 

खा. डॉ.अजित गोपछडे हे गेल्या दोन दिवसापासून बिलोली , देगलूर, धर्माबाद या तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत . अतिवृष्टीने फटका बसलेल्या प्रत्येक गावात जाऊन तेथील शेतकरी आणि ग्रामस्थांशी आत्मीय संवाद साधत आहेत. नागरिकांच्या वेदना जाणून घेत त्यावर फुंकर घालण्यासाठी त्यांना धीरे देत आहेत. राज्य सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपण या भागाच्या नुकसान भरपाईसाठी विशेष पॅकेजची मागणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत संवेदनशील मुख्यमंत्री असल्याने शेतकऱ्यांच्या व्यथा , वेदनांची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे निश्चितपणे लवकरच या भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ते आर्थिक मदत जाहीर करतील , यासाठी आपला पाठपुरावाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

काल देगलूर तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन पाहणी केल्यानंतर आज सकाळीच खा. डॉ. अजित गोपछडे यांनी बिलोली तालुक्यातील लोहगाव, तळणी, कासराळी, कोल्हेबोरगाव, कुंभरगांव, बेळकोणी खु., बेळकोणी बु., कोळगाव, कांगठी-खपराळा, गुजरी, कौठा, आरळी, पिंपळगाव, हूनगुंदा, नागणी, माचनूर आधी अतिवृष्टी गावांना भेटी दिल्या. 

 या भेटी दरम्यान त्यांनी वाहून गेलेले रस्ते, पूल, खरडून गेलेली शेती , पुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची ही पाहणी केली. ज्या भागातील रस्ते आणि पूल वाहून गेले आहेत , त्या भागातील रस्ते आणि पुलांची माहिती संबंधित विभागाने तातडीने आपल्याला पुरवावी , त्या रस्त्याच्या पुनरउभारणीसाठी आपण निश्चितपणे पाठपुरावा करू असेही त्यांनी यावेळी सांगितले . या तिन्ही तालुक्यात अतिवृष्टीचा फटका खरीप हंगामाला सर्वाधिक बसला आहे. त्यामुळे बिलोली, देगलूर, धर्माबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सरसकट पीक विमा मंजूर करावा यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले . दरम्यान शेतकऱ्यांनी आणि अतिवृष्टीग्रस्तांनी खचून न जाता हिमतीने वागावे , सरकार आपल्या पाठीशी असल्यामुळे लवकरच यातून मार्ग निघेल असा विश्वासही त्यांनी दिला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!