SR 24 NEWS

अपघात

नगर-मनमाड महामार्ग मृत्यूचा सापळा! राहुरी फॅक्टरीतील विवाहित तरुणाचा ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू;

Spread the love

राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) ११ सप्टेंबर : – नगर-मनमाड महामार्ग दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा ठरत असून गुरुवारी सायंकाळी पुन्हा एकदा या रस्त्यावर भीषण अपघातात राहुरी फॅक्टरीतील विवाहित तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हॉटेल क्रांतीसमोर घडलेल्या या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नितीन उर्फ पप्पू बापूसाहेब ढोकणे (वय ३५, रा. अंबिकानगर, राहुरी फॅक्टरी) हा तरुण दुचाकीवरून जात असताना मालवाहतूक ट्रक (क्रमांक RJ 11 GC 0012) ने चिरडल्याने जागीच मृत्यू झाला.

अपघात इतका भीषण होता की त्याला वैद्यकीय मदतीची संधीदेखील मिळाली नाही. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी ट्रकचा पाठलाग करून वाहन अडवले; मात्र चालक हा ट्रक सोडून पसार झाला.मृत नितीन ढोकणे यांच्या मागे आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुली असा परिवार असून त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे अंबिकानगर परिसरासह राहुरी फॅक्टरी परिसर शोकमग्न झाला आहे.

घटनास्थळी रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे, किशोर पंडित, दत्तू साळुंके, मुन्ना पंडित यांच्यासह स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन मदतकार्य केले. तसेच राहुरी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब शेळके व पोलीस प्रवीण बागुल यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

दरम्यान, केवळ मागील 15 दिवसांत नगर-मनमाड महामार्गावर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. वारंवार होणाऱ्या या अपघातामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून या महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!