श्रीरामपूर प्रतिनिधी / रंगनाथ तमनर : श्रीरामपूर तालुक्यातील गुजरवाडी येथील टाकळीभान रोड परिसरात अज्ञात चोरट्याने एका घरात घरफोडी करून सुमारे पावणेचार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, फिर्यादी सौ. ऋतिका संतोष जाधव (वय ३२, रा. गुजरवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मंगळवार, दि. २० जानेवारी २०२६ रोजी पहाटे १.३० ते ५.०० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चोरट्याने फिर्यादीच्या सासऱ्यांच्या खोलीचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत घरात प्रवेश केला. घरातील कोणालाही संशय येऊ न देता कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून चोरटा पसार झाला.
या घरफोडीत एकूण ६१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीस गेले असून त्यामध्ये १० ग्रॅमचे सोन्याचे नेकलेस व १० ग्रॅमची पोत, ९ ग्रॅमचे कानातील वेल, प्रत्येकी ४ ग्रॅमच्या दोन अंगठ्या, पतीची ४ ग्रॅमची अंगठी, १० ग्रॅमची दुसरी पोत तसेच ४ ग्रॅमचे कानातील टॉप्स यांचा समावेश आहे. चोरीस गेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत अंदाजे ३ लाख ८६ हजार ९५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर व प्रभारी पोलीस निरीक्षक धनवडे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप मंडलीक व पोलीस हवालदार एन. आर. बर्डे करीत आहेत.
श्रीरामपूर तालुक्यात घरफोडी; पावणेचार लाखांचे सोन्याचे दागिने लंपासअज्ञात चोरट्याकडून पावणेचार लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

0Share
Leave a reply











