राहुरी प्रतिनिधी :अहिल्यानगर–मनमाड राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर असून राहुरी शहरात एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली आहे. मात्र, वाहतूक मंद गतीने सुरू असताना काही वाहनचालक रॉंग साईडने वाहने चालवत असल्याने वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत होती. या पार्श्वभूमीवर राहुरी पोलीस स्टेशनच्या वाहतूक विभागाने मंगळवार, दि. २० जानेवारी २०२६ रोजी विशेष मोहीम राबवून कडक कारवाई केली.
या मोहिमेत रॉंग साईडने वाहन चालवणाऱ्या एकूण २५ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण १८ हजार २५० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. रॉंग साईडने येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक पूर्णतः जाम होत असून सामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले होते.
यावेळी राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, सर्व वाहनचालकांनी आपली वाहने केवळ एकेरी लेनमध्येच चालवावीत. कोणत्याही परिस्थितीत रॉंग साईडने वाहने नेऊ नयेत. नियमांचे उल्लंघन केल्यास वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरून सामान्य नागरिकांना नाहक त्रास होतोच, शिवाय संबंधित वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार भाऊसाहेब आव्हाड तसेच पोलीस हवालदार ठोंबरे, दरेकर व फुलमाळी यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
राहुरीत रॉंग साईड वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई ; २५ वाहनधारकांवर कारवाई करत १८,२५० रुपयांचा दंड वसूल

0Share
Leave a reply












